दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार द्या, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही: सपकाळ यांचा इशारा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर दुष्काळाच्या मुद्द्यावरून टीका करत सरसकट कर्जमाफी आणि तात्काळ मदतीची मागणी केली.
राज्यातल्या अनेक भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा खंड आणि त्यामुळे झालेलं पिकांचं नुकसान यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारला जोरदार लक्ष्य केलं आहे.
सपकाळ म्हणाले की, राज्यातल्या अनेक भागांत दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे. दीड महिन्यापासून पावसाचा एकही थेंब पडलेला नाही आणि शेतातली पिकं करपून गेली आहेत. असं असतानाही महायुती सरकारचं याकडे लक्षच नाही, असा आरोप त्यांनी केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त चर्चा होते, पण ठोस निर्णय घेतला जात नाही आणि पालकमंत्री शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत, असंही ते म्हणाले. शेतकरी संकटात असताना सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत, राज्यातली दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी सपकाळ यांनी केली. तसंच सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
दुष्काळाच्या मुद्द्यावर पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपा-महायुती सरकार संवेदनशील नाही आणि शेतकरी होरपळून निघत असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय. कुंभमेळ्यात सीसीटीव्ही बसवण्यासाठी सरकार ३५० कोटी रुपये खर्च करतं, पण शेतकऱ्यांना पैसे द्यायला मात्र टाळाटाळ करतंय, असा आरोप त्यांनी केला. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची गरज असतानाही तो निर्णय अजून घेतलेला नाही, असंही ते म्हणाले. जनतेमध्ये महायुती सरकारबद्दल प्रचंड चीड असल्याचं सांगत, सत्ताधारी मात्र निर्ढावलेले असून त्यांना शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेशी काही देणंघेणं नाही, फक्त भ्रष्टाचार आणि टक्केवारीतच त्यांना रस असल्याची टीका सपकाळ यांनी केली. अजून वेळ गेलेली नाही आणि सणासुदीचे दिवस असल्याने सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून दसऱ्याआधी भरीव मदत द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाबाबतही सपकाळ यांनी टीका केली. मोदींनी १२ वर्षांत काय दिवे लावले म्हणून त्यांच्या वाढदिवसाला दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं, असं ते म्हणाले. मोदींच्या काळात तरुणांना नोकऱ्या नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी संकटात आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे आणि महागाई गगनाला भिडली आहे, अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणं अशोभनीय असल्याचं ते म्हणाले. मोदींनीच सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, तेल कमी वापरा, काटकसर करा असं आवाहन केलं होतं आणि स्वतःच्या वाढदिवसाला तेलाचे दिवे लावा असं सांगितलं, हा प्रकारच संतापजनक असून ही आत्मपूजा असल्याची टीका त्यांनी केली. देशाला इतका खोटारडा आणि रंग बदलणारा पंतप्रधान मिळाला हे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले.
निवडणूक आयोगावरही सपकाळ यांनी निशाणा साधला. निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा हस्तक बनला असून एसआयआरच्या माध्यमातून मतदानाचा हक्कच हिरावून घेतला जातोय, हे लोकशाहीवरचं मोठं संकट असल्याचं ते म्हणाले. निवडणूक आयोगाचा कारभार अराजकाकडे नेत असल्याचा आरोप करत, याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून देशात लोकशाही टिकावी यासाठी काँग्रेस रस्त्यावर लढाई लढत असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.