Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
19 सप्टेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या तयारीला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोठा धक्का बसला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषणाला बसण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या तयारीला मोठा झटका बसला आहे. 19 सप्टेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी-शर्ती आपण पाळू, असे हमीपत्रही जरांगे यांनी दिले होते. मात्र इतकी तयारी करूनही आझाद मैदान पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे, त्यामुळे 19 सप्टेंबरच्या नियोजित आंदोलनाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या कारणानुसार, या आंदोलनाचा फटका दक्षिण मुंबईतील रोजच्या व्यवहारांना बसू शकतो. शाळा, हॉस्पिटल, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य व्यवस्था अशा शहराच्या रोजच्या कामकाजावर या आंदोलनामुळे ताण येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. म्हणजेच केवळ वाहतुकीचाच नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित अनेक यंत्रणांवर याचा परिणाम होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊनच परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी झालेल्या जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाचा दाखलाही पोलिसांनी यावेळी दिला आहे. त्यावेळी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते, त्यामुळे सीएसएमटी परिसर आणि महानगरपालिकेच्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. नागरिकांची मोठी गैरसोय झाली आणि कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न त्यावेळी निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मागच्या वेळी आझाद मैदानात पाच हजार लोकांची मर्यादा घालून परवानगी दिली होती, पण प्रत्यक्षात त्याहून जास्त गर्दी जमल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे यावेळी नव्याने परवानगी देण्याबाबत पोलिसांनी अधिक सावध भूमिका घेतल्याचे दिसते आहे.
यंदा मुंबईत गणेशोत्सवाचा माहोल असल्याने शहरात आधीच मोठी गर्दी होणार आहे. विसर्जन मिरवणुका आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे शहरातील अनेक भागांत वाहतूक आणि सुरक्षेचे मोठे आव्हान असते. गणेशोत्सवाच्या या काळात जरांगे यांच्या आंदोलनामुळे आणखी गर्दी वाढून परिस्थिती अधिक अवघड होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सव आणि उपोषण एकाच वेळी झाल्यास बंदोबस्तावर आणखी ताण येईल, असे पोलिसांना वाटते.
आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर आता पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली जाणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे जरांगे या निर्णयावर पुढे काय भूमिका घेतात आणि 19 सप्टेंबरच्या मुंबई दौऱ्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.