रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून बनवा टेस्टी कुरकुरीत रोटी कटलेट; नोट करून घ्या रेसिपी
उरलेल्या पोळ्या फेकून न देता त्यापासून सोपं आणि कुरकुरीत रोटी कटलेट बनवता येतं. जाणून घ्या सोपी रेसिपी.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
घरोघरी रोज पोळ्या केल्या की काही ना काही पोळ्या उरतातच. हा जवळपास प्रत्येक घरात होणारा प्रकार आहे. दुसऱ्या दिवशी त्याच पोळ्या पुन्हा खाव्याशा वाटत नाहीत आणि शेवटी त्या टाकून द्याव्या लागतात. पण या उरलेल्या पोळ्यांपासून सकाळच्या नाश्त्याला चविष्ट आणि कुरकुरीत रोटी कटलेट बनवता येतं, हे फार कमी जणांना माहीत असतं.
या रेसिपीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वेगळं किंवा महाग असं काहीही आणावं लागत नाही. घरात असलेल्या भाज्या, रोजचे मसाले आणि इतर जुजबी साहित्य वापरून हे कटलेट सहज तयार होतात. बनवायला सोपी असलेली ही रेसिपी घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांचा वापर करूनही तयार करता येते. लहान मुलांपासून घरातल्या मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रोटी कटलेट रेसिपी एकदा नक्की करून बघावी.
रोटी कटलेट करण्यासाठी लागणारं साहित्य असं - ४ ते ५ उरलेल्या पोळ्या, २ उकडलेले बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप बारीक चिरलेली गाजर किंवा उपलब्ध असलेली कोणतीही भाजी, १ ते २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, चवीपुरतं मीठ, ब्रेड क्रम्ब्स किंवा रवा आणि तळण्यासाठी तेल.
कृती करताना आधी उरलेल्या पोळ्यांचे लहान तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचे. हे बारीक झालेलं पोळीचं मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून त्यात उकडलेले बटाटे चांगले कुस्करून मिसळायचे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर किंवा हाताशी असलेली भाजी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची. लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला आणि मीठ घालून हे सगळं साहित्य नीट एकजीव करून घ्यायचं.
मिश्रण जर सैल किंवा पातळ वाटलं तर त्यात थोडे ब्रेड क्रम्ब्स किंवा रवा घालता येतो. हाताला थोडं तेल लावून या मिश्रणाचे लहान गोळे करायचे आणि हलक्या हातानं कटलेटचा आकार द्यायचा. मग तवा गरम करून त्यावर थोडं तेल सोडायचं आणि तयार केलेली कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करायची. गरमागरम रोटी कटलेट चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करता येतात.
कटलेट अजून जास्त कुरकुरीत हवं असेल तर बाहेरून रवा किंवा ब्रेड क्रम्ब्सचा हलकासा थर लावता येतो. आवडीप्रमाणे भाज्यांमध्ये मटार, बीट किंवा कोबी घातलं तरी चालतं. अशा प्रकारे कमी वेळात आणि कमी साहित्यात घरातल्या घरात एक चविष्ट आणि पोटभरीचा नाश्ता तयार होतो.