Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
अमेरिकेने पहिल्यांदाच मान्य केलं की पृथ्वीच्या कक्षेत त्यांची स्पेस कंट्रोल शस्त्रं तैनात आहेत, पण त्यांचा तपशील गुप्त ठेवला आहे.
अंतराळातील महासत्तांमधली स्पर्धा आता एका नव्या आणि धोकादायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. अमेरिकेने पहिल्यांदाच उघडपणे मान्य केलं आहे की, पृथ्वीच्या कक्षेत त्यांच्याकडे 'ऑन-ऑर्बिट स्पेस कंट्रोल वेपन्स' तैनात आहेत. म्हणजेच पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कक्षेतच अमेरिकेने अशी शस्त्रं ठेवली आहेत, जी अंतराळातील घडामोडींवर नियंत्रण ठेवू शकतात. या घोषणेमुळे चीन आणि रशियासोबत अंतराळातील लष्करी स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही शस्त्रं नेमकी कोणती आहेत, त्यांची संख्या किती आहे आणि त्यांच्यात नेमकी काय क्षमता आहे, याबाबत अमेरिकेने गुप्तता कायम ठेवली आहे.
अमेरिकेच्या हवाई दलाचे सचिव ट्रॉय मिंक यांनी अमेरिकेकडे कक्षेत तैनात असलेली 'स्पेस कंट्रोल वेपन्स' असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. शत्रूच्या अंतराळातील हालचालींपासून अमेरिकन सैन्याचं संरक्षण करण्यासाठी ही शस्त्रं वापरली जाऊ शकतात, असं त्यांनी नमूद केलं. पण या शस्त्रांचा नेमका प्रकार काय आहे, त्यांची संख्या किती, ती केव्हा तैनात करण्यात आली किंवा नेमक्या कोणत्या कक्षेत ती सध्या कार्यरत आहेत, याबद्दल कोणतीही माहिती अमेरिकेने जाहीर केलेली नाही. त्यामुळे अमेरिकेने ही कबुली दिली असली तरी प्रत्यक्ष तपशिलाबाबत अनेक प्रश्न कायम आहेत.
अंतराळातील 'स्पेस कंट्रोल' मोहिमेत शत्रूच्या क्षमतांना अडथळा आणणं, त्या कमकुवत करणं किंवा गरज भासल्यास त्या पूर्णपणे नष्ट करणं, अशा गोष्टींचा समावेश होतो. यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र, जॅमिंग किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. पण अमेरिकेने सध्या नेमक्या कोणत्या प्रणाली प्रत्यक्षात तैनात केल्या आहेत, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे कक्षेत नेमकी कोणती शस्त्रं आहेत, याबद्दलचे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत.
अमेरिकेच्या या घोषणेनंतर चीनने लगेच प्रतिक्रिया दिली असून अंतराळाला युद्धभूमी बनवू नये, असा इशारा दिला आहे. रशियानेही अंतराळ शस्त्रमुक्त ठेवण्याची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे, चीन आणि रशिया या दोन्ही देशांकडूनही अंतराळातील लष्करी क्षमता सातत्याने वाढवली जात असल्याचा दावा अमेरिकेकडून केला जात आहे. म्हणजेच तिन्ही बाजूंनी एकमेकांवर अंतराळात लष्करी तयारी वाढवल्याचा आरोप केला जात आहे.
आजच्या घडीला उपग्रह हे लष्करी संचार, नेव्हिगेशन, गुप्तचर माहिती आणि क्षेपणास्त्र इशारा यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहेत. त्यामुळे भविष्यात एखादा संघर्ष उद्भवल्यास अंतराळातील उपग्रह आणि तंत्रज्ञान हेच सर्वात मोठं लक्ष्य ठरू शकतं. अमेरिकेने केलेली ही कबुली त्यामुळे एका नव्या 'स्पेस वॉर'च्या शर्यतीची सुरुवात मानली जात आहे.