मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, त्र्यंबकेश्वरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारची ट्रकला धडक, 4 जागीच ठार
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळील आटगावच्या हद्दीत कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या भाविकांच्या कारने महामार्गावर कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याचे समजते. हा अपघात इतका भीषण होता की जागेवरच चार जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण गंभीर जखमी झाले.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील जोगेश्वरी भागात राहणारे जयस्वाल कुटुंब बुधवारी, 16 सप्टेंबर रोजी नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आपल्या कारने मुंबईकडे परतत होते. देवदर्शन आटोपून कुटुंब आनंदाने घराकडे निघाले होते. कार आटगाव शिवारात पोहोचली असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकला या कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चुरडा झाला आणि गाडीतील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या अपघातात 4 जणांचा जागेवरच मृत्यू झाला.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मोठे प्रयत्न केले. दुर्दैवाने चौघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आनंदात देवदर्शन करून घरी परतताना अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे जयस्वाल कुटुंबावर आणि जोगेश्वरी परिसरात शोककळा पसरली आहे. देवदर्शनावरून सुखरूप परतण्याच्या आनंदाचे रूपांतर अचानक दुःखात झाल्याने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
घटनास्थळी पोहोचलेल्या शहापूर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली. अपघातातील मृत आणि जखमींची निश्चित ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. हा अपघात नेमका चालकाला डुलकी आल्यामुळे झाला, अतिवेगामुळे झाला की वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.