वरोऱ्यात दिवसा घरफोडी; सोने-रोकड मिळून १.२५ लाखांचा मुद्देमाल लंपास
वरोरा शहरातील विधाते ले-आऊट भागात भरदिवसा एका बंद घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी दुपारी १२ ते ४ या चार तासांच्या कालावधीत ही घरफोडी झाली. घरमालक सुशांत गोपाल आगलावे यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबादेवी वार्डच्या मागे असलेल्या विधाते ले-आऊट भागात राहणारे सुशांत आगलावे (वय ३०) मंगळवारी सकाळी घरातच होते. सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी बहिणीला नागपूरला जाण्यासाठी रत्नमाला चौकात सोडले. त्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास आई सुनिता आगलावे यांना मोहबाळा येथील मामाच्या घरी सोडून ते घरी परत आले. दुपारी १२ वाजेपर्यंत सुशांत घरात होते. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाला व्यवस्थित कुलूप लावून ते वरोऱ्यातील महाकाल गणेश मंडळात मित्रांना भेटायला गेले आणि पुढे व्होल्टेज कॉलनीतील एका मित्राच्या घरी गेले.
दरम्यान दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आई मामाच्या गावाहून घरी परतल्या असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. दरवाज्याचा कडी-कोंडा आणि कुलूप तुटलेले पाहून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच मुलगा सुशांतला फोन करून बोलावले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. आगलावे कुटुंब घरात गेले असता बेडरूममधील लोखंडी गोदरेज कपाटाचे कुलूप तोडलेले आणि दोन्ही दरवाजे उघडे दिसले, तर आतील कपडे आणि इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील साड्यांमध्ये लपवलेली सोन्याच्या दागिन्यांची छोटी पर्स आणि १० हजार रुपयांची रोकड असलेली मोठी पर्स गायब होती.
चोरट्यांनी कपाटातून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बदामी अंगठी (किंमत ५० हजार रुपये), ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत ३० हजार रुपये), अडीच ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची बिंदी-लटकन (किंमत २५ हजार रुपये) आणि १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम लॉकेट (किंमत १० हजार रुपये) असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज पळवला. यासोबतच पर्समध्ये ठेवलेले १० हजार रुपये रोख असे मिळून एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.
घर बंद असल्याचा फायदा घेत भरदिवसा चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५(अ) आणि ३३१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर मिट्टलवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू आहे.