चंद्रपुरात महात्मा फुले जयंतीनिमित्त पुरोगामी संघटनांची बैठक; वर्षभर प्रबोधनात्मक कार्यक्रमांवर चर्चा
चंद्रपुरात महात्मा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त पुरोगामी संघटनांची बैठक, वर्षभर प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्याचा निर्णय
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील पुरोगामी, सामाजिक आणि परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक १५ सप्टेंबर रोजी चंद्रपुरातील गेस्ट हाऊस येथे पार पडली. जिल्ह्यातील विविध संघटनांचे कार्यकर्ते या बैठकीसाठी एकत्र आले होते.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे होते. महात्मा फुले द्विशताब्दी महोत्सव समितीचे समन्वयक संजय मौर्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेचे संचालन डॉक्टर राकेश गावतुरे यांनी केले.
बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रसार कसा करता येईल यावर सविस्तर चर्चा झाली. सामाजिक समता, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्त्री-पुरुष समानता या मुद्द्यांवरही उपस्थितांनी विचार मांडले. जातीय भेदभाव निर्मूलनासाठी जनजागृती करणे, तसेच समाजातील वंचित घटकांचे प्रश्न व्यापक स्वरूपात मांडण्याबाबतही या बैठकीत उहापोह करण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने केंद्र किंवा राज्य शासनाच्या पातळीवर कोणताही शासकीय कार्यक्रम राबवला जात नसल्याची खंत उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. यासाठी शासनावर दबाव कसा निर्माण करता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन या द्विशताब्दी वर्षात प्रबोधन आणि परिवर्तनवादी कार्यक्रमांच्या माध्यमातून हे वर्ष कसे साजरे करता येईल, याबाबतही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध पुरोगामी संघटनांनी एकत्रितपणे हे कार्यक्रम राबवण्याची भूमिका मांडली, जेणेकरून महात्मा फुले यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील.
या कार्यक्रमासाठी नागपूरहून महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार, नानाभाऊ लोखंडे, गुलाबराव चिचाटे, राजेंद्र पाटील तसेच यवतमाळहून ओबीसी संघटनेचे विलास भाऊ काळे, डॉ. धावले उपस्थित होते. चंद्रपुरातील सत्यशोधक समाजाचे अॅडव्होकेट प्रशांत सोनुले, अरुण धानोरकर, अविनाश आंबेकर, सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे नरेंद्र, मराठा सेवा संघाचे महादेव धूमणे, दीपक जेऊरकर, दिलीप चौधरी, बहुजन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर विवेक बांबोडे, समता परिषदेचे डॉक्टर संजय घाटे, बहुजन हितकारणी सभेचे बंडूभाऊ नगराळे, बाबासाहेब असोसिएशनचे अॅडव्होकेट निरंजने, अॅडव्होकेट पूनमचंद वाकडे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.