बुधवार, 16 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:42 IST

गोंदिया LCBची कारवाई; अवैध वाळू वाहतुकीतील ८ जण अटकेत, ५०.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने तीन दिवसांत तीन ठिकाणी नाकाबंदी करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतले.

गोंदिया LCBची कारवाई; अवैध वाळू वाहतुकीतील ८ जण अटकेत, ५०.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

गोंदिया जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकाने १४ ते १६ सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ८ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत ७ ब्रास वाळू, ५ ट्रॅक्टर आणि १ टिप्पर असा एकूण ५०,७२,००० रुपये (५० लाख ७२ हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

पहिली कारवाई १४ सप्टेंबर २०२६ रोजी दवनीवाडा पोलीस स्टेशन हद्दीत झाली. महालगाव ते रतनारा मार्गावर नाकाबंदी सुरू असताना वैनगंगा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडण्यात आले. यात ट्रॉलीसह २ ट्रॅक्टर आणि २ ब्रास वाळू असा एकूण १५,१२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाला. या प्रकरणी राजकुमार नैताम नागपुरे (३०, रा. महालगाव) आणि जितेंद्र तिलकचंद ठाकरे (४४, रा. देवरी) यांना अटक करण्यात आली.

दुसरी कारवाई १५ सप्टेंबर २०२६ रोजी रावणवाडी पोलीस स्टेशन हद्दीत झाली. तेढवा ते काटी रोडवर नाकाबंदी लावून तेढवा आणि डांगुर्ली घाटातून अवैध वाळू वाहतूक करणारे १ ट्रॅक्टर आणि १ टिप्पर जप्त करण्यात आले. यात १ ट्रॅक्टर, १ टिप्पर आणि ३ ब्रास वाळू असा २१,१८,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हाती लागला. या प्रकरणी खिलेंद्र रामकिशोर म्हात्रे (२९, रा. मरारटोला), प्रदीप खुशाल भुरे (२२, रा. पांढराबोडी), राहुल राजू उईके (२५, रा. सलाईटोला) आणि यश राधेश्याम लिल्हारे (रा. गद्दाटोली, गोंदिया) यांना अटक झाली.

तिसरी कारवाई १६ सप्टेंबर २०२६ रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीत झाली. सलाईटोला ते चिरचाळी मार्गावर उमरझरी नाल्यातून चोरटी वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडण्यात आले. यात ट्रॉलीसह २ ट्रॅक्टर आणि २ ब्रास वाळू असा १२,१२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाला. या प्रकरणी आशिष राजकुमार राऊत (२८, रा. डव्वा) आणि मेघनाथ सखाराम उंदीरवाडे (५३, रा. डव्वा, ता. सडक अर्जुनी) यांना अटक करण्यात आली.

ही यशस्वी कारवाई पोलीस हवालदार संजय चव्हाण, सोमेंद्रसिंग तूरकर, रियाज शेख, दीक्षितकुमार दमाहे, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, तुळशीदास लुटे, दुर्गेश तिवारी, तसेच पोलीस शिपाई छगन विठ्ठले, सुनील डहाके, निखिल मेश्राम, राकेश इंदूरकर आणि विलेश ठाकरे यांच्या पथकाने पार पाडली. अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा गोंदिया पोलीस प्रशासनाने दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ