दिल्लीतील प्रदूषणावर हवामान बदलाचा परिणाम ५१ तासांनी दिसतो; IITM पुण्याचे संशोधन
दिल्लीतील वायुप्रदूषणामागे वाहनांचा धूर आणि औद्योगिक उत्सर्जनासोबतच हवामानातील बदलही कारणीभूत असल्याचे IITM पुण्याच्या संशोधनातून समोर आले आहे.
दिल्लीतील घातक वायुप्रदूषणामागे केवळ वाहनांचा धूर, औद्योगिक उत्सर्जन किंवा इतर मानवनिर्मित कारणे नसून हवामानातील बदलांचाही मोठा हातभार असल्याचे एका नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे तापमानातील बदल किंवा हवामानाच्या स्थितीचा परिणाम प्रदूषणाच्या पातळीवर लगेच होत नाही, तर काही हवामान घटकांचा प्रभाव तब्बल ५१ तासांच्या विलंबानंतर दिसून येतो. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) केलेल्या संशोधनातून हा महत्त्वाचा निष्कर्ष पुढे आला आहे.
'एन्व्हायर्नमेंटल सायन्स: ॲटमॉस्फिअर्स' या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. IITM चे प्रमुख संशोधक विवेक सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१७ ते २०२५ या काळातील दिल्लीच्या हवामानाचा आणि पीएम २.५ प्रदूषणाचा अभ्यास केला. यात तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग, सौर किरणोत्सर्ग, पृष्ठभागावरील दाब आणि वातावरणाच्या खालच्या थराची उंची म्हणजे बाउंडरी लेअर हाइट, या घटकांचा पीएम २.५च्या पातळीशी काय संबंध आहे हे तपासले गेले.
संशोधनानुसार तापमानातील बदलाचा पीएम २.५वर परिणाम दिसण्यासाठी ५१ तासांपर्यंत विलंब लागू शकतो. आर्द्रता आणि वाऱ्याच्या वेगाचा परिणामही काही तासांनंतरच दिसतो. तापमानासाठी हा विलंब तीन तासांचा, आर्द्रतेसाठी चार तासांचा, पावसासाठी पाच तासांचा, तर वाऱ्याच्या वेगासाठी सुमारे ११ तासांचा असल्याचे संशोधकांना आढळले.
वातावरणाच्या खालच्या थराची उंची कमी झाली की प्रदूषकांना वरच्या वातावरणात पसरण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही, हे संशोधनातून पुढे आले. हिवाळ्यात ही उंची ५०० मीटरपेक्षा कमी होते, त्यामुळे प्रदूषक जमिनीजवळ अडकून राहतात आणि पीएम २.५ची पातळी झपाट्याने वाढते. वारा कमी असेल तर प्रदूषकांचा साठा वाढतो, तर वेगवान वारा प्रदूषक विखुरण्यास मदत करतो.
दिल्लीत सकाळी ६ ते ९ आणि रात्री ८ ते ११ या वेळेत प्रदूषणाची पातळी सर्वाधिक नोंदवली गेली. नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांत पीएम २.५ची पातळी अनेकवेळा २०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपेक्षा जास्त होती. संपूर्ण अभ्यासकाळात ही पातळी कमाल ८७९.६ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. याउलट पावसाळ्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे ही पातळी ५०पेक्षा कमी होते.
२०१७ ते २०२५ या नऊ वर्षांत दिल्लीतील पीएम २.५च्या सरासरी पातळीत संथ पण सातत्याने घट झाल्याचेही संशोधनात नोंदवले गेले. २०१७ मध्ये ही सरासरी १२७.७ होती, ती २०२५ मध्ये ८० पर्यंत खाली आली. हवामान आणि प्रदूषण यांच्यातील हा परस्परसंबंध स्पष्ट झाल्यामुळे भविष्यात प्रदूषणाचा अंदाज आणि पूर्वसूचना देणारी यंत्रणा अधिक अचूक करण्यासाठी या संशोधनाची मदत होऊ शकते.