गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
07:11 IST

घुग्घुस एमआयडीसीतील लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाने शेती नापीक, शेतकऱ्यांचा २५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस एमआयडीसीतील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी या लोह प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणामुळे उसगाव परिसरातील शेकडो एकर शेती नापीक झाल्याचा आरोप शेतकरी व पर्यावरण संस्थेने केला आहे.

घुग्घुस एमआयडीसीतील लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाने शेती नापीक, शेतकऱ्यांचा २५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस एमआयडीसी परिसरातील स्थिती गंभीर बनली आहे. येथील लोह प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या घातक रसायनांमुळे उसगाव भागातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि एका पर्यावरण संस्थेने केला आहे.

वर्धा नदी आणि स्थानिक उसगाव नाला मोठ्या प्रमाणावर दूषित झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संतप्त शेतकरी आणि पर्यावरण संस्थेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) कार्यालयात दूषित पाणी टाकून आंदोलन केले.

एमआयडीसी घुग्घुस येथील मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या लोह प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात घातक वायू, रासायनिक घनकचरा आणि जलप्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे उसगाव व घुग्घुस परिसरातील शेकडो एकर सुपीक शेती उद्ध्वस्त झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वर्धा नदी तसेच उसगाव नाला रासायनिक द्रव्यांमुळे कमालीचा दूषित झाल्याचा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले आणि स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

या समस्येबाबत १६ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री तसेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन पाठवण्यात आले. तसेच MPCB च्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर कारखान्यातून बाहेर पडणारा घातक रासायनिक कचरा व दूषित पाणी ओतून संस्थेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी निवेदनात म्हटले आहे की, १८ ऑगस्ट रोजी कंपनीने उसगाव नाल्यात मोठ्या प्रमाणावर विषारी रासायनिक द्रव्य सोडले, ज्यामुळे सुमारे १०० एकराहून अधिक शेतजमीन पूर्णपणे नापीक झाली. कंपनीकडून अनेक नियमबाह्य कामे सुरू असल्याचा आरोप करत बेले यांनी १० मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये ईएसपी डस्टची (डोलोचार) बेकायदेशीर विक्री, संध्याकाळी व रात्रीच्या वेळी हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवणे, रात्रीच्या अंधारात ईएसपी डस्टची विल्हेवाट व वाहतूक करणे, सर्व प्रदूषण नियंत्रण यंत्रणा निकामी असणे, ग्रीस व कोळशामिश्रित सांडपाणी थेट नाल्यात सोडणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा दुप्पट उत्पादन घेऊन सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवणे अशा आरोपांचा समावेश आहे.

कारखान्याच्या कारभाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत संस्थेने MPCB चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. संबंधित अधिकारी कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण करत असल्यानेच कंपनीवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तानाजी यादव, सुशीलकुमार राठोड, नंदकिशोर लोमटे व स्वप्निल लिंगडे या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी संस्थेने केली आहे.

कंपनीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून तिची पर्यावरण परवानगी रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या २५ सप्टेंबर रोजी मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासमोर बाधित शेतकरी आत्मदहन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात उसगाव येथील शेतकरी मोहनदास धोंडूजी राजूरकर, वामन बापूजी राजूरकर, बंडू धोंडूजी राजूरकर, रामरतन बापूजी राजूरकर, सुधाकर मल्हारी ठाकरे आणि नितेश पांडुरंग ठाकरे सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ