मेघना गुलजार म्हणाल्या, यश-अपयश पूर्णपणे माझे; आई-वडील वेगळे झाले तरी संगोपनात उणीव नाही
दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी बालपणापासून ते आगामी 'दायरा' सिनेमापर्यंतचा प्रवास उलगडला, आई-वडिलांच्या विभक्त होण्यापासून 'गुलजार' आडनावाच्या ओझ्यापर्यंत मनमोकळेपणाने बोलल्या.
दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी एका मुलाखतीत त्यांच्या बालपणापासून ते येऊ घातलेल्या 'दायरा' या सिनेमाच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास मोकळेपणाने सांगितला. आई-वडील वेगळे झाल्याचा अनुभव, 'गुलजार' या आडनावाचे ओझे आणि बॉक्स ऑफिसच्या गणितांबद्दल त्यांनी मांडलेली स्पष्ट मते सध्या चर्चेत आहेत.
गीतकार गुलजार आणि अभिनेत्री राखी यांची मुलगी असलेल्या मेघना यांनी लहानपणी कथ्थक, सितार, कराटे, बॅले आणि पेंटिंगचे धडे घेतले होते. आई-वडील वेगळे झाले असले तरी दोघांनीही अत्यंत सन्मानाने आयुष्य जगले आणि आपल्याला कधीही 'मोडलेल्या घरातलं मूल' असल्यासारखं वाटू दिलं नाही, असं मेघना सांगतात. शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमाला दोघेही न चुकता हजर असायचे, असं त्या आवर्जून नमूद करतात. गुलजार या आडनावाचा आपल्याला मनापासून अभिमान आहे, पण केवळ त्याच चष्म्यातून पाहिलं जावं हे आपल्याला आवडत नाही, असं त्या म्हणतात. माझं यश आणि माझं अपयश हे पूर्णपणे माझंच असायला हवं, अशी भूमिका मेघना यांनी स्पष्टपणे मांडली.
करिअरच्या सुरुवातीला 'फिलहाल' या सिनेमानंतर काही सिनेमे फ्लॉप गेल्यावर मेघना यांनी दिग्दर्शनापासून काही काळ अंतर ठेवलं होतं. अशावेळी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी मातृत्वाच्या नावाखाली घरी बसून न राहता 'तलवार' सिनेमाचं दिग्दर्शन करावं, असा मोलाचा सल्ला दिला. या सिनेमानं मेघना यांचं आयुष्यच पूर्णपणे बदलून टाकलं.
आगामी 'दायरा' सिनेमाबद्दल बोलताना मेघना यांनी स्पष्ट केलं की, हा सिनेमा एकाच घटनेवर बेतलेला नसून समाजात घडणाऱ्या अनेक खऱ्याखुऱ्या घटनांचं एकत्रीकरण आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगताना कलाकारांवरच्या विश्वासाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.
मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, आई-वडील वेगळे झालेले असूनही संगोपनात किंवा प्रेमात कधीच उणीव भासली नाही. सुरुवातीच्या अपयशानंतर दिग्दर्शनापासून दूर गेलेल्या मेघना यांनी विशाल भारद्वाज यांच्या आग्रहामुळे 'तलवार'द्वारे जोरदार पुनरागमन केलं. केवळ व्यावसायिक यशासाठी किंवा जास्त कमाईसाठी कथेच्या मूळ हेतूशी आणि प्रामाणिकपणाशी कधीही तडजोड करणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली. वडील गुलजार यांनी आपल्या सिनेमांसाठी लिहिलेली गाणी हेच त्यांचं आजवरचं सर्वोत्तम काम असल्याचं मेघना मानतात.
वडिलांच्या मार्गदर्शनाबद्दल बोलताना मेघना म्हणाल्या की, पूर्ण स्क्रिप्ट लिहून झाल्यावर सर्वात आधी ती बाबांना दाखवून त्यांचा प्रामाणिक फीडबॅक घेतला जातो. अभिनेत्री कोंकणा सेन शर्माच्या अभिनयाचं कौतुक करताना मेघना म्हणाल्या, कोंकणा इतक्या सहजतेनं अभिनय करते की जणू ती लहान मुलांचा खेळ आहे. तसंच विनीत जैन यांच्यासारखे निर्भयपणे महत्त्वाच्या कथा पडद्यावर आणणारे निर्माते इंडस्ट्रीत दुर्मिळ असल्याचंही त्यांनी नमूद केलं.