एकाच गादीवर वर्षानुवर्षे झोपताय? गादी कधी बदलावी, हा सोपा नियम 99% लोकांना माहिती नाही
गादीची योग्य निगा कशी राखावी आणि ती कधी बदलावी, याबद्दल सोपे नियम.
माणूस आयुष्यातला जवळपास एक तृतीयांश वेळ झोपेत घालवतो. एवढा मोठा काळ आपण झोपेत घालवत असल्यामुळे, रोज ज्या गादीवर आपण तास न् तास आराम करतो, तिची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. बरेच जण फक्त चादर बदलण्यावरच लक्ष देतात आणि गादीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतात, पण गादीची व्यवस्थित देखभाल केली नाही तर त्याचा परिणाम थेट आरोग्यावर आणि गादीच्या टिकाऊपणावरही होतो.
एकच गादी दीर्घकाळ वापरत राहिलं की शरीराचं वजन सतत त्याच भागावर पडतं. असं सतत एकाच भागावर वजन पडत राहिल्याने यामुळे गादीत खड्डे पडू शकतात किंवा तिची पातळी असमान होऊ शकते. ही अडचण टाळण्यासाठी गादीची योग्य निगा राखणं गरजेचं आहे.
ज्या गाद्या दोन्ही बाजूंनी वापरता येतात, अशा गाद्या दर 3 ते 6 महिन्यांनी उलट्या करण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्याने शरीराचा दाब गादीच्या सगळ्या बाजूंनी सारखा विभागला जातो आणि एकाच भागावर सतत ताण येत नाही.
पण मेमरी फोम किंवा ऑर्थोपेडिक गादीसारख्या फक्त एकाच बाजूने वापरता येणाऱ्या गाद्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या गाद्या उलट्या करता येत नाहीत. त्याऐवजी दर 3 ते 6 महिन्यांनी त्या फक्त फिरवाव्या लागतात, म्हणजे डोक्याकडची बाजू पायाकडे आणि पायाकडची बाजू डोक्याकडे करावी लागते.
गादी वापरताना आणखी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. प्रत्येक गादीची रचना वेगवेगळी असते, त्यामुळे गादी विकत घेताना किंवा वापरताना कंपनीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना नक्की तपासाव्यात.
गादीवर साचणारी धूळ, घाम आणि घाण साफ करण्यासाठी अधूनमधून बेडशीट काढून गादीला मोकळी हवा द्यायला हवी. गादीला घाम, ओलावा आणि अचानक सांडणाऱ्या द्रव पदार्थांपासून वाचवण्यासाठी मॅट्रेस प्रोटेक्टर वापरणं फायद्याचं ठरतं, कारण त्यामुळे गादीच्या आतल्या भागाला ओलावा पोहोचत नाही.
योग्य काळजी घेतल्यास गादीचं आयुष्य वाढू शकतं, पण कोणतीही गादी कायम टिकत नाही, हे लक्षात ठेवायला हवं. साधारणपणे चांगल्या गादीचं आयुष्य 7 ते 10 वर्षं मानलं जातं. गादीवर खूप खड्डे पडले असतील, स्प्रिंगमधून आवाज येऊ लागला असेल किंवा सकाळी उठल्यावर अंगात वेदना किंवा कंबरदुखी जाणवत असेल, तर अशा स्थितीत नुसती गादी उलटी किंवा फिरवून चालत नाही. ही सगळी लक्षणं दाखवतात की आता नवी गादी घेण्याची वेळ आली आहे.