Manoj Jarange On ED Notice: मुंबईच्या आंदोलनापूर्वी मराठा आंदोलकांना ईडीच्या नोटिसा..; जरांगे पाटलांचा
मुंबईतील उपोषणापूर्वी मराठा आंदोलकांना ईडीच्या नोटिसा पाठवल्या जात असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा आधीच केली आहे. १५ सप्टेंबरपासून ते मुंबई दौऱ्याला सुरुवात करणार असून, या घोषणेनंतर पाच दिवसांत जरांगे पाटील आणि इतर मराठा आंदोलक मुंबईत पोहोचतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन रोखण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. आपल्या जवळच्या लोकांना ईडीकडून नोटिसा पाठवल्या जात असल्याचे सांगत, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता मला संशय यायला लागला आहे. माझ्या आजूबाजूच्या जवळच्या लोकांना ईडीच्या नोटिसा दिल्या जात आहेत. हा काय प्रकार आहे?" असा सवाल जरांगे यांनी केला. ईडीला एक दर्जा असतो, पण अंतरवाली सराटीतील सामान्य लोकांना नोटीस पाठवली, तर ईडीची इज्जत काय राहणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशभरात अनेक मोठमोठी प्रकरणे प्रलंबित असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, त्याऐवजी अंतरवालीतील सामान्य लोकांची चौकशी सुरू असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांवर दबाव आणण्यासाठीच ईडीच्या नोटिसांचा वापर केला जात असल्याचे जरांगे म्हणाले. "माझ्याबरोबर काम करतात म्हणून फडणवीसांनी कुणालातरी हाताखाली धरायचे आणि आंदोलनाला पाठिंबा देऊ नये म्हणून ईडीच्या नोटिसा द्यायच्या. याचा अर्थ यांना आंदोलन बंद पाडायचे आहे," असा आरोप त्यांनी केला. "मला साथ देणाऱ्यांना गार करायचे, आंदोलन बंद पाडण्यासाठी सगळे सुरू आहे," असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आवाहन करत, ईडीच्या नोटिसा मिळालेल्या संबंधित व्यक्तींच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहावे असे सांगितले.
ईडीच्या नोटिसा आलेल्या लोकांशी आपली सविस्तर चर्चा झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. या लोकांनी नोटीस येताच लगेच आपल्या पदाला लाथ मारली असून त्यांच्याजवळ काहीच नाही, असा दावा त्यांनी केला. "आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत," असे जरांगे म्हणाले. नोटीस मिळालेल्या लोकांकडे संबंधित व्यवहारांचा पूर्ण हिशोब असून तो आधीच तयार ठेवण्यात आला होता आणि तो संबंधित यंत्रणेला सादरही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट इशारा दिला. "फडणवीस, तुमच्या पाहुण्यांनाही ईडीच्या नोटिसा जातील. आमचे लोकही अर्ज देतील. ईडीला फक्त अंतरवालीचीच चौकशी करायची आहे का?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जरांगे यांच्या या गंभीर आरोपांवर राज्य सरकार किंवा संबंधित तपास यंत्रणेकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.