गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:05 IST

धाराशिव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात, जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल

धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने जवळपास ९५ टक्के खरीप क्षेत्रावर आर्द्रता ताण, जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालातून समोर आली गंभीर स्थिती

धाराशिव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात, जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

धाराशिव जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामाला पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. जून आणि जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने अचानक दडी मारली आणि सप्टेंबरमध्येही हीच स्थिती कायम राहिली. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील जवळपास ९५ टक्के खरीप क्षेत्रावर तीव्र आर्द्रता ताण निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिलेल्या संक्षिप्त अहवालानुसार ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पिके सुकून अकाली परिपक्व झाल्याने आता पाऊस पडला तरी उत्पादन वाढण्याची शक्यता फार कमी उरली आहे.

धाराशिव जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६०३.१० मिमी इतके आहे. पण यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे स्वरूप अनियमित राहिले. जूनमध्ये सरासरीच्या ९७.६० टक्के तर जुलैमध्ये १००.१० टक्के पाऊस पडला. मात्र ऑगस्टमध्ये केवळ ४३.१ मिमी म्हणजे सरासरीच्या २७.९० टक्के इतकाच पाऊस झाला. सप्टेंबरमध्येही परिस्थिती सुधारली नाही, १४ सप्टेंबरपर्यंत जेमतेम ६.८ मिमी म्हणजे ३.७ टक्के पाऊस नोंदवला गेला. यामुळे जून ते १४ सप्टेंबर या काळात सरासरीच्या तुलनेत ४८.४९ टक्के पावसाची तूट राहिली.

ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत सलग २९ ते ३५ दिवस पाऊसच पडला नाही. सप्टेंबरमध्येही ७ ते १२ दिवस पावसाने पाठ फिरवली. जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळांपैकी स्वयंचलित हवामान केंद्रे असलेल्या ४५ मंडळांच्या नोंदीनुसार जूनमध्ये २२, जुलैमध्ये १२, ऑगस्टमध्ये २९ आणि सप्टेंबरमध्ये १७ दिवस पावसाचा खंड नोंदवला गेला. जून ते सप्टेंबर या काळात एकूण ८० दिवस पाऊस न पडल्याने पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जमिनीतील ओलावा कमी झाला.

यंदा जिल्ह्यात ५ लाख ३९ हजार २७ हेक्टरवर खरीप पेरणी झाली, त्यापैकी सोयाबीनचे क्षेत्र ४ लाख ६७ हजार ३२२ हेक्टर म्हणजे ८६.७० टक्के आहे. त्यानंतर तूर ३४ हजार ८३१ हेक्टर, उडीद २१ हजार ८८६ हेक्टर आणि मूग ५ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर आहे. पावसाच्या मोठ्या खंडाचा सर्वाधिक फटका हलक्या जमिनीवरील सोयाबीन आणि उडीद पिकांना बसला. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे वाळली असून शेतकरी सोयाबीन उपटून ते जनावरांना चारा म्हणून देत आहेत. मध्यम ते भारी जमिनीवरील पिकांनाही फुलोरा, शेंगा किंवा कणसे तयार होण्याच्या आणि दाणे भरण्याच्या टप्प्यावर मोठा फटका बसला.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे जवळपास ९५ टक्के क्षेत्रावरील पिके सुकून अकाली परिपक्व झाली आहेत. या टप्प्यानंतर पाऊस पडला तरी पिकांची वाढ आणि उत्पादन पूर्वीसारखे होण्याची शक्यता मर्यादित राहते. त्यामुळे यापुढे पाऊस झाला तरी झालेली उत्पादन घट मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची शक्यता कमी आहे.

आयआयटी बॉम्बेच्या अहवालातही ही स्थिती अधोरेखित झाली आहे. एमएनसीएफसीच्या निरीक्षणांनुसार १ जून ते २१ ऑगस्ट या काळात जिल्ह्याची पर्जन्यस्थिती डिफिशियंट म्हणजे उणे २० ते उणे ६० टक्के या वर्गात होती, तर ६ ते २१ ऑगस्ट या काळात ती स्कँटी म्हणजे उणे ६० ते उणे १०० टक्के या गंभीर वर्गात नोंदवली गेली. मॉइश्चर अॅडिक्वेसी इंडेक्सनुसारही विविध तालुक्यांतील जमिनीतील ओलाव्याची स्थिती प्रतिकूल असल्याचे स्पष्ट झाले.

पिकांवरील संकटासोबतच जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थितीही चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु मिळून एकूण २२५ जलप्रकल्प आहेत, त्यांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता ७२५.४० दलघमी आहे. पण सध्या केवळ ५५.०३० दलघमी म्हणजे आठ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. भूजल विकास यंत्रणेच्या ११४ निरीक्षण विहिरींच्या नोंदीनुसार सप्टेंबर २०२६ मधील सरासरी भूजलपातळी ९.५३ मीटर असून मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत त्यात ७.०२ मीटरने घट झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांपाठोपाठ पिण्याच्या पाण्याचे संकटही येत्या काळात अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

एकीकडे पावसाअभावी खरीप पिके हातची जाण्याची स्थिती आणि दुसरीकडे घटता जलसाठा व खालावणारी भूजलपातळी, अशा दुहेरी संकटात जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. प्रशासनाने २ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, आयआयटी बॉम्बेचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील शेतकरी यांच्या सहभागातून प्रत्येक मंडळातील किमान दोन गावांमध्ये प्रत्यक्ष पिकांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या पाहणी अहवालांमधून पावसाचे असमान वितरण, दीर्घ पर्जन्यखंड आणि ऑगस्टमधील अल्प पावसामुळे खरीप पिकांची स्थिती गंभीर झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता पाऊस येईल या आशेवर न राहता, प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मोठे आव्हान शासन आणि प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ