जरांगे पाटील मुंबईकडे रवाना; आरक्षणासाठी लढून मरण्याचा निर्धार
अंतरवाली सराटीतील उपोषण सोडून जरांगे पाटील आझाद मैदानाकडे निघाले, मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाची धग पुन्हा एकदा वाढली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथली उपोषणाची जागा सोडून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा त्यांचा निर्धार आहे. अंतरवाली सराटीतून निघताना जरांगे पाटील भावूक झालेले दिसले. गाडीत बसताच त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.
यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका करत आपली भूमिका मांडली. समाजाच्या लेकरांपेक्षा मोठं आपल्यासाठी काहीच नाही, असं ते म्हणाले. माझ्या समाजाची मुलं संकटात आहेत, त्यांच्या भल्यासाठी मी निघालोय, असं सांगत त्यांनी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.
सरकारला वाटतंय मी त्यांच्यापुढे शरण जावं, पण समाजाच्या लेकराला अर्धवट सोडून मी समाजाचा विश्वासघात करू शकत नाही, असं जरांगे पाटील म्हणाले. मला संपवणार आहेत म्हणूनच मी आझाद मैदानावर जातोय, असंही त्यांनी सांगितलं. माझ्या समाजाला त्रास होऊ देणार नाही, मी लढूनच मरेन, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
मुंबईकडे निघताना त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. न्यायदेवतेवर विश्वास ठेवायचा आणि तिचाच निर्णय ही परवानगी समजायची, असं सांगत त्यांनी समाजाला संयम बाळगण्याची विनंती केली. पक्षापेक्षा समाजाला जास्त महत्त्व द्या, असंही आवाहन त्यांनी केलं.
मी आझाद मैदानावर बसणार आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी पुन्हा बोलून दाखवला. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले, त्यामुळे अंतरवाली सराटीतून त्यांचा निघतानाचा क्षण भावनिक ठरला.
मुंबईतील आंदोलनासाठी जरांगे पाटील यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी दोनदा परवानगी नाकारल्यानंतर आता तिसऱ्यांदा हा अर्ज देण्यात आला आहे. या अर्जात ५० जणांना आंदोलनाची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांनी घातलेल्या नियम आणि अटींचं पालन केलं जाईल, असंही या अर्जात नमूद करण्यात आलं आहे. १८ सप्टेंबरला ठरवून दिलेल्या वेळेतच आंदोलन केलं जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेता परवानगी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मुंबई पोलीस जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत काय निर्णय घेतात, याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.