मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कोणाच्यातरी इशाऱ्यावरून; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा आरोप
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी नागपुरात टीका केली. शेतकरी मदत आणि रोहित पवार यांच्यावरही त्यांनी भाष्य केलं.
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन एका नॉन इश्यूला इश्यू बनवून सुरू आहे आणि हे आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आलं आहे, असं राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात बोलत होते.
आपला देश कायद्यावर चालतो, याकडे लक्ष वेधत जयस्वाल म्हणाले की व्हॅलिडीटी कमिटीचं काम प्रत्येक गोष्टीची तपासणी करणं हेच असतं. माधुरी पाटील यांच्या प्रकरणात जो निकाल आला, त्यात जी कागदपत्रं आवश्यक ठरवण्यात आली, त्यात काही चुकीचं झालं असेल तर न्यायालयात दाद मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र अशा पद्धतीने महाराष्ट्रात अराजकतेचं वातावरण तयार करून, ज्यांनी मराठा समाजाला सर्वात जास्त न्याय दिला त्यांच्याबद्दल समाजात संभ्रम निर्माण करणं योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. हे सगळं कोणाच्यातरी इशाऱ्यावरून, द्वेषातून आणि पूर्वग्रहातून घडत असल्याचं आपलं स्पष्ट मत असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं.
ज्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला अनेक योजनांपासून वंचित ठेवलं आणि ज्यांनी प्रत्यक्षात मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं, त्यांच्याबद्दल आज जनतेत खोटं नेरेटिव्ह पसरवून संभ्रम निर्माण केला जात आहे. हे आता मराठा समाजातल्या लोकांच्याही लक्षात आलं आहे, असं जयस्वाल म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना जयस्वाल यांनी सांगितलं की राज्यात मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने हजार कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. कर्जमाफीतही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे. सध्या उद्भवलेल्या संकटावर सरकारचं प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष आहे आणि शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडलं गेलं नाही. इतिहासात शेतकऱ्यांना मदत करण्याचा आपल्या सरकारचा विक्रम असल्याचं ते म्हणाले. सरकारसमोर आर्थिक अडचणी येतच असतात, पण त्या अडचणी आम्ही शेतकऱ्यांना सांगत नाही, आम्ही शेतकऱ्यांना मदत करत राहतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवार यांच्याबद्दल विचारलं असता जयस्वाल म्हणाले की रोहित पवार सध्या स्वतःला चर्चेत आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत, आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. दिशा सालियान प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की ती एक प्रक्रिया असून त्याबद्दल तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनीच बोलणं योग्य ठरेल, मात्र प्रत्येक घटनेची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी असं आपलं मत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दर आठवड्याला असलेल्या स्थितीवर कॅबिनेटमध्ये चर्चा होत असते. सर्व पालकमंत्र्यांना जिल्हानिहाय आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मुख्यमंत्र्यांचंही यावर लक्ष आहे. एकूण नुकसानीची आकडेवारी तपासून त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असंही जयस्वाल यांनी नमूद केलं.