मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, अंतरवाली सोडताना अश्रू अनावर
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील उपोषणाची जागा सोडून आझाद मैदानाच्या दिशेने कूच केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईची वाट धरली आहे. अंतरवाली सराटी इथली आपली उपोषणाची जागा सोडून ते आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या निर्धाराने निघाले. पण अंतरवाली सोडताना वातावरण चांगलंच भावूक झालं होतं.
गाडीत बसताच जरांगेंना रडू कोसळलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी समाजाच्या लेकरांच्या भल्यासाठी कोणत्याही परिस्थितीत लढा सुरूच ठेवणार असल्याचं ठामपणे सांगितलं. सरकारसमोर कधीच झुकणार नाही आणि मराठा आरक्षणाची मागणी पूर्णपणे मान्य होईपर्यंत थांबणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
भावना अनावर होत जरांगे पाटील म्हणाले, "माझ्या समाजाच्या लेकरांपेक्षा मला काहीही मोठं नाही. माझी लेकरं संकटात आहेत आणि त्यांच्यासाठीच मी निघालो आहे. सरकारला वाटतंय मी शरण यावं, पण समाजाच्या लेकरांना अर्ध्यावर सोडून मी कधीच धोका देणार नाही. मला मारून टाकणार आहेत म्हणूनच मी आझाद मैदानावर जातोय. मी माझ्या समाजाला काहीही त्रास होऊ देणार नाही आणि लढून मरेन."
पुढे त्यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, "आपण न्यायदेवतेवर विश्वास ठेवायचा आणि तीच आपली परवानगी समजायची. सगळ्यांना माझं आवाहन आहे की पूर्ण शांत राहा. तुमच्या लेकरांसाठी मी लढणार आहे. सरकारने मला चारही बाजूंनी घेरलंय, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. मी जिवंत असो वा नसो, तुम्ही समाज मोठा करा."
"कोणत्याही पक्षाला जीव लावू नका, फक्त आपल्या समाजाला जीव लावा. मी मुंबईला जातोय, तुम्ही सगळे मला आशीर्वाद द्यायला या. मला मारायचं असेल तर मारू द्या, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही," असंही ते म्हणाले.
पुन्हा एकदा भावूक होत, डोळे पुसत जरांगे पाटलांनी सांगितलं की आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी झाल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत. सरकारने मारण्याचा प्रयत्न केला तरी आपण थेट आझाद मैदानावरच जाऊन बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईतील आंदोलनासाठी जरांगे पाटील यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. आधी दोनदा परवानगी नाकारल्यानंतर आता या तिसऱ्या अर्जात फक्त 50 जणांना उपोषणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान सगळे नियम आणि अटी काटेकोरपणे पाळल्या जातील आणि 18 सप्टेंबरला ठरलेल्या वेळेतच आंदोलन केलं जाईल, असं या अर्जात स्पष्ट म्हटलं आहे.
या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळण्याची शक्यता अजूनही खूपच कमी आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहू शकतो, तसंच पोलिसांवर प्रचंड ताण येईल. त्यामुळे गणेशोत्सव संपल्यावरच अशा आंदोलनांना परवानगी दिली जाईल, असं समजतं.