मराठा आरक्षण आंदोलनाला छत्रपती शाहू महाराजांचा पाठिंबा, सरकारवर टीका
जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी पाठिंबा दिला असून, आंदोलनाची वेळ येण्यास सरकारची भूमिका कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केल्यानंतर आता ते मुंबईत आंदोलन करण्यासाठी राजधानीकडे निघणार आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी लढणाऱ्या जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणे, हे सरकारच्या भूमिकेचे अपयश असल्याची टीका छत्रपती शाहू महाराज यांनी केली. समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी लढणाऱ्या या आंदोलनाला सकल समाजाचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या मागण्या कायदेशीर कसोटीवर टिकतील अशा पद्धतीने शासनाने त्यावर तातडीने आणि प्रभावीपणे कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.
मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासह विविध मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आला आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शांततामय मूक मोर्चे निघाले, तसेच विविध तालुके आणि जिल्ह्यांमध्ये ठिय्या आंदोलनेही झाली. या आंदोलनांचा पुढचा टप्पा म्हणून जरांगे पाटील यांनी वेळोवेळी प्रदीर्घ उपोषणे केली आहेत. आंदोलने थांबवण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी आश्वासने देण्यात आली, मात्र ती पूर्णपणे अंमलात आणण्यात शासन आणि प्रशासन अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नसल्याचा दावा शाहू महाराजांनी केला. याच कारणामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला याआधीही सकल मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. आता मुंबईतील प्रस्तावित आंदोलनालाही कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे छत्रपती शाहू महाराजांनी सांगितले. शासनाने पुढाकार घेऊन मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर कायदेशीर चौकटीत तोडगा काढावा आणि प्रभावी कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी जरांगे पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. नियमभंग, संभाव्य वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत मुंबई पोलिसांनी याआधी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. आझाद मैदानावर शांततापूर्ण आंदोलन आणि उपोषण करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी नव्या अर्जातून केली आहे. याआधी त्यांच्या प्रतिनिधींकडून परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र आता स्वतः जरांगे पाटील यांनी अधिकृत ईमेलद्वारे परवानगी मागितल्याने प्रशासनाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे मुंबईतील आंदोलनाच्या परवानगीचा प्रश्न अद्याप कायम असताना, दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांच्या पाठिंब्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला राजकीय बळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.