गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:21 IST

बुलढाण्यात वन्यप्राण्यांचा कोवळ्या पिकांवर हल्ला, शेतकऱ्यांवर रात्रीच्या रखवालीची वेळ

पावसाने ओढ दिल्यानंतर आता रोही, नीलगाय, हरीण आणि माकडांच्या टोळ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतांमध्ये घुसून कोवळी पिके फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होत आहे.

बुलढाण्यात वन्यप्राण्यांचा कोवळ्या पिकांवर हल्ला, शेतकऱ्यांवर रात्रीच्या रखवालीची वेळ
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम अजूनही सुखावह ठरलेला नाही. रोहिणी आणि मृग नक्षत्रात पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे खरिपाच्या पेरण्याच सुरुवातीलाच लांबल्या. सुरुवातीला बरा वाटणारा पाऊस पिके ऐन जोमात असतानाच गायब झाला. फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या नाजूक अवस्थेत असलेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध त्या सिंचन साधनांच्या भरवशावर धडपड सुरू केली. अशातच शेतशिवारात वन्यप्राण्यांच्या टोळ्यांनी कोवळ्या पिकांवर हल्ला चढवल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

जिल्ह्यात शेती हाच बहुतांश कुटुंबांचा मुख्य आधार आहे आणि हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने कधी चांगले दिवस येतात तर कधी संकट कोसळते. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी संकटाचाच ठरला आहे. मान्सून दोन आठवडे उशिराने दाखल झाला, त्यामुळे पेरण्याही लांबल्या. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. यात भर म्हणून किडींचा प्रादुर्भावही वाढू लागला आहे. पाऊस येत नाही, किडीचा त्रास थांबत नाही, अशातच आता कोवळ्या पिकांमध्ये रोही, नीलगाय, हरीण आणि माकड यांचा मुक्तपणे वावर सुरू झाला असून हे प्राणी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत.

पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसरात्र शेतात रखवाली करावी लागत आहे. एकीकडे उपलब्ध पाण्याच्या साधनांनी पिके जगवण्याची धडपड आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.

पीक नुकसानभरपाईबाबत बोलताना पांगरी उबरहंडे येथील शेतकरी गणेश देशमुख यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, शेतकरी राबराब राबून पीक पिकवतो, पण एकीकडे बाजारात योग्य भाव मिळत नाही आणि दुसरीकडे वन्यप्राणी पिकांचे मोठे नुकसान करतात. नुकसानभरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज केला तरी कागदपत्रांचा ससेमिरा मागे लावला जातो. त्यानंतरही वनविभाग अत्यंत तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसतो, अशी टीका देशमुख यांनी केली.

मेरा खुर्द येथील शेतकरी रामदास मुजुमले यांनीही आपली व्यथा मांडली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे ते म्हणाले. जे काही उत्पन्न होते त्यालाही बाजारात योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे दरवर्षी कर्ज काढून पेरणी करावी लागते. कधी निसर्ग साथ देतो तर कधी हिरावून घेतो, असे ते म्हणाले. पीकपाणी चांगले आले तरी शेतशिवारात रोह्यांचे कळप धुडगूस घालत असल्याने पिकांचे नुकसान होतेच. शेतशिवारात येणाऱ्या या वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी मुजुमले यांनी केली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ