चिमूरमध्ये काँग्रेसच्या मोर्चात ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह शेतकरी रस्त्यावर, वडेट्टीवारांचा आमदार भांगडियांवर हल्ला
चिमूर पंचायत समिती ते तहसील कार्यालय या काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चात शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
चिमूरमध्ये काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात सत्ताधाऱ्यांविरोधात शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येत जोरदार आवाज उठवला. चिमूर पंचायत समितीपासून सुरू झालेला हा मोठा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार सहभागी झाले आणि त्यांनी स्थानिक आमदार बंटी भांगडिया यांच्यावर थेट टीका केली. शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला सारून सत्ताधारी कंत्राटांमध्ये गुंतल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकरी अडचणीत, तरुण बेरोजगार, महागाईने सर्वसामान्य त्रस्त आणि कष्टकरी सरकारी धोरणांमुळे संकटात असताना सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा कंत्राटांमध्येच जास्त रस असल्याचा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला. "कंत्राटातून मलिंदा लाटणाऱ्या ठेकेदार आमदाराला जनतेच्या समस्यांची काय जाणीव?" असा थेट सवाल त्यांनी भांगडिया यांच्यावर निशाणा साधत विचारला.
काँग्रेसच्या या जनआक्रोश महामोर्चाने सत्ताधाऱ्यांविरोधातील संतापाला जाहीर व्यासपीठ मिळवून दिले. शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक ट्रॅक्टर आणि बैलगाड्या घेऊन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.
तहसील कार्यालयासमोर जमलेल्या जनतेला संबोधित करताना वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांनी पीकविमा भरूनही नुकसानभरपाईसाठी वाट पाहावी लागते, पिकांचे नुकसान झाले तरी सरकारी यंत्रणांचे उंबरठे झिजवावे लागतात, आणि दुसरीकडे सत्तेतील लोक विकासाच्या नावाखाली कंत्राटांचे गणित मांडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
"ज्यांच्या हातात जनतेने सत्ता दिली, त्यांनी जनतेच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी विधिमंडळ सभागृहात गेल्या बारा वर्षांपासून मौन धारण करून स्वतःच्या हिताचे राजकारण केले, तर जनता शांत बसणार नाही," असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. ब्रह्मपुरी भागात गेल्या दहा वर्षांत गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत 80 टक्के सिंचन व्यवस्था करून जनतेला न्याय मिळवून दिल्याचेही ते म्हणाले.
भांगडिया या ठेकेदार आमदाराने रस्ते आणि त्यांची कंत्राटे आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना देऊन त्यांना मालामाल करण्याखेरीज काहीच काम केले नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. "आम्ही ठेकेदारी नाही तर सेवाधर्म निभावतो," असे ते म्हणाले.
मोर्चाला संबोधित करताना प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी सांगितले की, चिमूरच्या आमदाराने कंत्राट मिळवण्यापलीकडेही पराक्रम गाजवला असून नागपुरात गरिबांच्या हक्काच्या घरावर कब्जा केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे. चिमूर भागात जलजीवन मिशनची अनेक कामे रखडलेली असून सत्ताधारी आमदार मात्र गप्प बसल्याची टीका त्यांनी केली. भागातील रस्ते रखडलेले असून जनतेची कामे होत नसल्याची विदारक परिस्थिती चिमूर विधानसभा क्षेत्रात असल्याचेही त्या म्हणाल्या.
चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती, सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान, पीकविमा भरपाईचा प्रश्न आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे काँग्रेसने मोर्चाद्वारे मांडले. पीकविमा नुकसानभरपाई, चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करणे, पीककर्ज माफी, सातबारा कोरा करणे, धान बोनस आणि घोषित अनुदानाची तातडीने अंमलबजावणी अशा मागण्या मोर्चात करण्यात आल्या.
या मोर्चाला शिवानी वडेट्टीवार यांच्यासह चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. किरसान यांचे पुत्र ॲड. दुष्यंत किरसान, काँग्रेस पदाधिकारी विजय गावंडे, प्राध्यापक राम राऊत, जुनेद खान, विजय घरत, गजानन बुटके, धनराज मुगले, किशोर शिंगरे, विवेक कापसे, खोजरम मरसकोल्हे, विनोद बोरकर, राजू लोणारे, इरफान खान यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक उपस्थित होते.
मोर्चाचे खास वैशिष्ट्य ठरले ते शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आणि बैलगाड्या. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले असून महिला आणि युवकांचाही सहभाग लक्षणीय होता.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.