नागपुरात राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे आज उद्घाटन, गडकरी-फडणवीसांची उपस्थिती, पुलाला डॉ. हेडगेवार यांचे
उत्तर नागपुरातील इंदोरा ते दक्षिण नागपुरातील दिघोरीपर्यंत जाणारा 8.9 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल आज खुला झाला असून त्याला डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात राज्य सरकारकडून नागपूरकरांना एक मोठी भेट मिळाली आहे. उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणाऱ्या तब्बल 8.9 किलोमीटर लांबीच्या राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे उद्घाटन आज, 19 सप्टेंबर रोजी करण्यात आले. हा उड्डाणपूल उत्तर नागपुरातील इंदोरा भागापासून सुरू होतो आणि दक्षिण नागपुरातील दिघोरी भागापर्यंत जातो, म्हणजेच शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो पसरलेला आहे.
या उड्डाणपुलामुळे नागपूरकरांना उत्तर नागपुरातून थेट दक्षिण नागपूरपर्यंत कुठलीही वाहतूक कोंडी किंवा अडथळे न येता वेगाने प्रवास करता येणार आहे. आधी या मार्गावर जागोजागी चौक लागत असत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत असे, पण आता या नव्या पुलामुळे ते टळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी सुमारे 998 कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडले. या उड्डाणपुलामुळे नागपूरकरांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेष बाब म्हणजे हा उड्डाणपूल महाल भागातून जातो, आणि नेमका याच भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे घर आहे. पूल त्यांच्या घराच्या अगदी जवळून जातो. त्यामुळेच या उड्डाणपुलाला डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली असून या उड्डाणपुलाला 'डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपूल' असे नाव देण्यात येणार असल्याचे समजते.
राज्यातील या सर्वात लांब उड्डाणपुलाची काही ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत. या उड्डाणपुलावर एकूण 998 कोटी रुपये खर्च झाला असून प्रकल्पाची एकूण लांबी 8.9 किलोमीटर आहे. उड्डाणपूल 12 मीटर रुंदीचा असून दोन्ही दिशांनी म्हणजे येण्या-जाण्यासाठी वाहतूक करता यावी अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. हा पूल 'अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्सड काँक्रीट' या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला आहे.
या उड्डाणपुलाच्या मार्गात दोन आरओबी आणि दोन आरयूबी यांचा समावेश आहे. नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी पाचपावली येथील जुना आरओबी पाडण्यात आला आणि त्याजागी नवीन आरओबी बांधण्यात आला. डागा मेमोरियल रुग्णालयाजवळ बांधण्यात आलेले चढ-उतार रॅम्प खास रुग्णालयात ये-जा करणे सुलभ व्हावे यासाठी सोयीस्करपणे तयार करण्यात आले आहेत.
अशोक चौक येथे उड्डाणपुलावर एक खास चौक तयार करण्यात आला असून तेथे पाच दिशांचे रस्ते उड्डाणपुलावर येऊन मिळतात. याशिवाय उड्डाणपुलाच्या खालचा रस्ताही विकसित करण्यात आला आहे, म्हणजे पुलावरून आणि पुलाखालूनही वाहतूक सुरळीत होईल. या मार्गात नागपुरातील 3 प्रमुख आणि 11 छोटे चौक येतात आणि या सर्व चौकांमधील वाहतूक कोंडीची समस्या या उड्डाणपुलामुळे सुटणार आहे. एकंदरीत, उत्तर ते दक्षिण नागपूर हा प्रवास आता पूर्वीपेक्षा खूपच जलद आणि सुखकर होणार आहे.