'मांजर'चा टीझर आला, नावामागचं गूढ मात्र कायम; १८ सप्टेंबरला सिनेमा गृहात
चार मित्रांच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक घडणाऱ्या गमतीजमतींवर बेतलेला 'मांजर' हा सिनेमा १८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून, त्याचा टीझर आता समोर आला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मराठी सिनेमांमध्ये सध्या वेगवेगळ्या धाटणीचे प्रयोग होताना दिसत आहेत. काही सिनेमांची कथा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते, तर काहींचं नुसतं नावच उत्सुकता वाढवतं. 'मांजर' हा सिनेमा याच दुसऱ्या गटातला आहे. पोस्टर आल्यापासूनच या विचित्र नावामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली होती आणि आता टीझर आल्यानंतर ही उत्सुकता आणखी वाढली आहे.
टीझरमध्ये चार मित्रांच्या आयुष्यात एका मागोमाग एक अशा भन्नाट घटना घडताना दाखवल्या आहेत. एखादी गोष्ट निस्तरण्याचा प्रयत्न केला की परिस्थिती अजूनच बिघडते आणि त्यातून नवाच किस्सा उभा राहतो. पात्रांची धावपळ, एकमेकांना सावरता सावरता वाढत जाणारा गोंधळ आणि त्यातून तयार होणारा विनोद, यामुळे हा सिनेमा एक चांगला फॅमिली एंटरटेनर वाटतो. मात्र या सगळ्या गडबडीत 'मांजर' नेमकं कुठे आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. सिनेमाच्या नावामागचं रहस्य टीझरमध्येही उलगडलेलं नाही.
सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये या चौघांच्या व्यक्तिरेखांभोवती या कथेतली गंमत फिरताना दिसते. यांच्यासोबत सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी आंधळे आणि अश्विनी काळसेकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये असणार आहेत. प्रत्येक पात्र कथेत आपापली भर घालत असल्यामुळे पुढच्या क्षणी नेमकं काय घडणार, याचा अंदाज बांधणंच अवघड होऊन जातं, असं टीझर पाहून वाटतं.
टीझरच्या शेवटी ऐकू येणारा एक संवाद या नावामागचं गूढ आणखी गडद करतो. "सिनेमाचं नाव 'मांजर' असलं तरी तिच्याशी माझा काही संबंध..." असा संवाद कानावर पडतो आणि त्यानंतर टीझर संपतो. विशेष म्हणजे शेवटी मांजरीचा आवाजही ऐकू येतो. त्यामुळे या गोंधळाचा आणि मांजरीचा नेमका संबंध काय, की नावामागे एखादा जबरदस्त ट्विस्ट लपलेला आहे, याचा उलगडा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच होणार आहे.
दिग्दर्शक सुशील महादेव यांनी सिनेमाबद्दल बोलताना सांगितलं, "'मांजर' हा सिनेमा प्रेक्षकांना मनापासून हसवणारा आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. पडद्यावर घडणाऱ्या गमतीजमती बघताना प्रेक्षकांनीही स्वतःला या प्रवासाचा भाग समजावं, हीच आमची इच्छा आहे. हा सिनेमा फॅमिली एंटरटेनर असल्यामुळे प्रेक्षकांनी तो आपल्या कुटुंबासोबत बघावा."
एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स यांनी सादर केलेल्या 'मांजर'चं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी हे या सिनेमाचे निर्माते आहेत, तर वितरणाची जबाबदारी एए फिल्म्सने घेतली आहे. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत, भाग्यश्री लिमये, सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी आंधळे आणि अश्विनी काळसेकर अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'मांजर' येत्या १८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या भन्नाट गोंधळामागे 'मांजर'चं नेमकं रहस्य काय आहे, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.