पत्नीला पैशांची माहिती दिली, वाद वाढला; कारखाना मालकाने गळफास घेतला
नागपूरजवळच्या कामठी तालुक्यात कारखाना मालकाने आत्महत्या केली, सुसाइड नोटच्या आधारे महिला कामगाराविरोधात गुन्हा दाखल.
नागपूरजवळच्या कामठी तालुक्यात एका कारखाना मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका महिला कामगाराने पैशांच्या व्यवहाराबाबत त्याच्या पत्नीला फोन करून माहिती दिली होती, आणि त्यावरून पती-पत्नीत मोठा वाद झाला होता. या वादानंतरच कारखाना मालकाने गळफास घेतला. या प्रकरणात मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारावर नवी कामठी पोलिसांनी त्या महिला कामगाराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्यातील येरखेडा गावचे रहिवासी प्रमोद रामटेके (वय ५५) हे रीना फूड्स नावाने चकली बनवण्याचा कारखाना चालवत होते. ते या कारखान्याचे मालक आणि संचालक होते. २५ ऑगस्ट रोजी त्यांनी कारखान्यातच गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.
तपासादरम्यान असं समोर आलं की घटनेच्या एक दिवस आधी प्रमोद यांनी त्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामिनी डोनारकर (वय ३५) हिच्या खात्यात ऑनलाइन दोन हजार रुपये ट्रान्सफर केले होते. हा व्यवहार झाल्याचं कामिनीने फोन करून प्रमोद यांच्या पत्नी रीना यांना सांगितलं. एवढंच नाही, तर पुन्हा असे पैसे ट्रान्सफर झाले तर प्रमोद यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करेन, असंही तिने रीना यांना सांगितलं होतं.
हे कळल्यावर रीना यांनी नवऱ्याला या पैशांच्या व्यवहाराबद्दल जाब विचारला. त्यावर प्रमोद यांनी सांगितलं की ती रक्कम प्रत्यक्षात दुसऱ्याच एका व्यक्तीला पाठवायची होती, पण चुकून ती कामिनीच्या खात्यात गेली. मात्र प्रमोद यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतरही पती-पत्नीमधला वाद कमी होण्याऐवजी वाढतच गेला.
घटनेनंतर पोलिसांना जो सुसाइड नोट सापडला, त्यात प्रमोद यांनी स्वतः लिहिलं होतं की कामिनीने पैशांच्या व्यवहाराची माहिती पत्नीला दिल्यामुळेच घरात हा वाद उभा राहिला. या नोटमध्ये त्यांनी कामिनीवर थेट आपल्याला आत्महत्येसाठी भाग पाडल्याचा आरोपही केला आहे.
सुसाइड नोट आणि तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे नवी कामठी पोलिसांनी शुक्रवारी कामिनी डोनारकर हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचीही पोलीस पडताळणी करत आहेत.