लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून, तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं, नगरसेवकासह तिघे फरार
लातूरमधील एका हॉटेलात जेवताना झालेल्या वादाचं रूपांतर खुनात झालं. परळीच्या तरुणाच्या छातीत तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले, नगरसेवकासह तिघे संशयित घटनेनंतर फरार झाले आहेत.
राज्यासोबतच देशभरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असून, या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर शहरातही एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील एका हॉटेलात जेवताना झालेला किरकोळ वाद थेट खुनापर्यंत जाऊन पोहोचला. हॉटेलच्या बाहेर भररस्त्यात एका तरुणाच्या छातीत तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाचं नाव बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असं आहे. या घटनेमुळे लातूरसोबतच परळी परिसरातही खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा अली शेख आणि परळीतील नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण व उमेर हे चौघेजण लातूरमध्ये आले होते. १६ सप्टेंबर रोजी बुधवारी रात्री साधारण सव्वाअकराच्या सुमारास बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली या रस्त्यावरील हॉटेल उमेरामध्ये हे चौघे जेवायला बसले होते. जेवण सुरू असतानाच त्यांच्यात जोरदार भांडण झालं. वाद वाढत गेल्यावर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तिथेच बाबा अली शेख यांच्या छातीत तीक्ष्ण चाकूने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. झालेली जखम गंभीर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस तपासात असं समोर येतंय की बाबा अली शेख आणि संशयित आरोपींमध्ये गेल्या काही वर्षांपासून आधीपासूनच वाद सुरू होता. हा जुना वाद लक्षात घेता त्यांना परळीहून लातूरला मुद्दाम आणलं गेलं होतं का, आधीच नियोजन करून, कट रचून हा हल्ला केला होता का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. मात्र या शक्यतेबाबत अधिकृतपणे काहीही सांगता येणार नाही, तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत ठोस माहिती समोर येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
या प्रकरणात परळीतील नगरसेवक खालेद शेख यांच्यासह अल्फाज पठाण आणि उमेर या तिघांवर संशय व्यक्त केला जात आहे. घटना घडल्यानंतर लगेचच हे तिघेजण पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या खुनामागचं नेमकं कारण काय, हल्ला आधीच ठरवून केला होता का आणि यात आणखी कोणी सामील आहे का, या सगळ्या बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत. लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात रात्रीच्या वेळी घडलेल्या या खुनामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.