समय रैनाचं नेटफ्लिक्सवर कमबॅक, नवाजुद्दीन सिद्दिकींना केलं जबरदस्त रोस्ट
इंडियाज गॉट लेटेंटच्या नव्या एपिसोडमध्ये समय रैनाने नवाजुद्दीन सिद्दिकी आणि भुवन बाम यांची जोरदार खेचली, क्लिप सोशल मीडियावर व्हायरल.
कॉमेडियन समय रैना गेल्या काही दिवसांपासून सतत वादात सापडला होता. त्याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमुळे त्याच्यावर बरीच टीका झाली, शो बंद पडला, त्याच्यावर केसही झाल्या. पण आता समयने जोरदार कमबॅक केलं आहे. नेटफ्लिक्सवर 'इंडियाज गॉट लेटेंट'चा नवीन एपिसोड आला असून तो येताक्षणीच व्हायरल झाला. फक्त 2 तासात या एपिसोडला 20 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून यूट्यूबवरही हा एपिसोड टाकण्यात आला आहे.
या एपिसोडच्या पॅनलवर मोठमोठी नावं होती. बॉलिवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, यूट्यूबर आणि अभिनेता भुवन बाम, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा आणि कॉमेडियन काइस्तुभ हे यावेळी पॅनलवर होते. समय नेहमीच्या स्टाईलमध्ये सगळ्यांना रोस्ट करत होता.
यातली सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती समयने नवाजुद्दीनला केलेल्या रोस्टिंगची. 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजचं कौतुक करता करता समयने नवाजला टोला लगावला. समय म्हणाला, "सीरिजमध्ये नवाज सर ड्रग्स घ्यायचे, दारू प्यायचे, वेश्या असणाऱ्या महिलांसोबत संबंध ठेवायचे आणि मग सेटवर यायचे." हे ऐकून पॅनलवरचे सगळे हसायला लागले. नवाजनेही याला भारी उत्तर दिलं. तो म्हणाला, "या शोसाठीसुद्धा मी अशीच काहीशी तयारी करून आलोय." यावर समय लगेच म्हणाला, "सर विचार करून बोला, या सीटवर आधीही बरंच काही घडलेलं आहे." समयचा हा जोक ऐकून नवाज थोडा विचारात पडल्यासारखा दिसला.
नवाजुद्दीननंतर समयने मोर्चा भुवन बामकडे वळवला. भुवनलाही त्याने सोडलं नाही. समय भुवनला म्हणाला, "अखेर तू यूट्यूबवर आलास." मग त्याने विचारलं, "तू यूट्यूब का सोडलंस?" भुवन काही बोलायच्या आधीच समय म्हणाला, "मी सोडलं कारण तुला पळता येईल." नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये लिहिलंय की भुवन बाम आणि नवाजुद्दीन दोघेही शो दरम्यान खूप जपून बोलत होते.
ही क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, "भुवन आणि नवाज काहीही बोलताना खूप काळजी घेत आहेत." वादग्रस्त काळानंतर समयचं हे कमबॅक लोकांना खूप आवडलं आहे. त्याची रोस्ट करण्याची स्टाईल आणि बिनधास्त बोलणं हीच त्याच्या शोची खासियत आहे. मोठ्या स्टार्सना समोर बसवून त्यांची खेचणं सोपं नसतं, पण समय ते सहज करतो. नेटफ्लिक्सवर शो आल्यामुळे त्याला आणखी मोठं प्लॅटफॉर्म मिळालं आहे आणि सोशल मीडियावर सध्या फक्त याच एपिसोडची चर्चा सुरू आहे.