दादर विसर्जनस्थळी वाद: 'VIP आधी, स्थानिकांना अडवलं' असा आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल
कीर्ती कॉलेजजवळच्या समुद्रकिनारी गणपती विसर्जनाच्या वेळी स्थानिक आणि प्रशासनामध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
गणपती बाप्पाला निरोप देताना दरवर्षी मुंबईत ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत भावुक वातावरण असतं. पण यंदा दादरमधून एक वेगळाच व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
हा व्हिडिओ दादरच्या कीर्ती कॉलेजजवळील समुद्रकिनाऱ्यावरचा आहे. विसर्जनाच्या वेळी तिथे झालेल्या गोंधळाचं चित्रण या व्हिडिओत दिसतं. सामान्य भाविकांना बाप्पाचं विसर्जन करू दिलं जात नाही, फक्त VIP लोकांनाच सूट दिली जाते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
dadarmumbaikar या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट झाला आहे. त्यात काही स्थानिक रहिवासी पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसतात. त्यांचं म्हणणं आहे की बाप्पाचं विसर्जन शास्त्रोक्त पद्धतीने होत नाहीये. विसर्जनासाठी प्रशासनाने मोठ्या कृत्रिम टाक्या उभारल्या असून तिथे विसर्जनासाठी पैसे घेतले जातात. मात्र हे काम ज्यांच्याकडे सोपवलं आहे ते नीट विसर्जन करत नाहीत आणि त्यामुळे मूर्तीची विटंबना होते, असंही स्थानिकांनी सांगितलं.
सर्वात मोठा आरोप म्हणजे VIP व्यक्तींना थेट आत प्रवेश दिला जातो, पण जे लोक लहानपणापासून दादरमध्ये राहतात आणि ज्यांचा हा समुद्रकिनारा आहे, त्यांनाच आत जाऊ दिलं जात नाही. व्हिडिओत एक व्यक्ती बोलताना दिसते, "आम्ही इथेच लहानाचे मोठे झालो. हा समुद्र आमचा आहे. तुम्ही आम्हालाच अडवताय. बाप्पाचं विसर्जन नीट करा, नाहीतर आम्हाला आमच्या हाताने करू द्या." स्वतःच्या हाताने बाप्पाला निरोप द्यायचा असतानाही प्रशासन तसं करू देत नसल्याने लोकांमध्ये संताप आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी अशा कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाते, कारण दरवर्षी समुद्रात विसर्जन करताना अपघात घडतात आणि पाणी प्रदूषित होतं. हे टाळण्यासाठीच ही व्यवस्था उभारली जाते. मात्र या तलावांमध्ये लोकांना स्वतः विसर्जन करू दिलं जात नाही, त्याऐवजी नेमलेले कर्मचारी विसर्जन करतात आणि तेही व्यवस्थित करत नाहीत, अशी तक्रार भाविकांनी केली आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 1 लाख 30 हजार लोकांनी पाहिला असून त्यावर मोठ्या संख्येने प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, "दारू पिऊन आलेली पोरं विसर्जन करतायत. मूर्तीची विटंबना होतेय. याची जबाबदारी कोण घेणार?" दुसऱ्या युजरने "VIP कल्चर बंद करा, प्रत्येकाचा आदर करा" अशी प्रतिक्रिया दिली, तर आणखी एकाने "कुंडात विसर्जन करण्यापेक्षा नैसर्गिक ठिकाणीच विसर्जन करावं" असं मत मांडलं. काही युजर्सनी प्रशासनाच्या बाजूने मत मांडत, "तिथे VIP लोकांना सोडतात हे माहित असूनही तुम्ही तिथेच का जाता?" असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोशल मीडियावरून सांगितलं होतं की, गणेशोत्सवात दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि या सुविधांसाठी नागरिकांनी महानगरपालिकेचे आभार मानले.