५० हजार जनतेचे स्वप्न पूर्ण; घुग्घूस ग्रामीण रुग्णालय सुरू
सेवा संकल्प अभियानांतर्गत पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते घुग्घूस येथील ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथे ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण झाले असून, सेवा संकल्प अभियानांतर्गत हा सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या सुसज्ज रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे आणि आमदार करण देवतळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्याला लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिकही हजर होते.
या रुग्णालयामुळे घुग्घूस आणि आजूबाजूच्या परिसरातील ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत तातडीच्या उपचारासाठी या भागातील नागरिकांना वारंवार चंद्रपूर शहरात जावे लागत होते, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसाही खर्च होत असे. आता स्थानिक पातळीवरच आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा घराजवळच मिळू शकेल.
आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, घुग्घूसच्या नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेता येथे सक्षम रुग्णालय असणे गरजेचे होते, असे ते म्हणाले. ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे आता तातडीच्या उपचारांसाठी चंद्रपूरला जाण्याची गरज कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.
घुग्घूसच्या एकूणच विकासाबद्दल बोलताना जोरगेवार म्हणाले की, अनेक वर्षे घुग्घूसचा कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालत होता. लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त असूनही या शहराला नगर परिषदेचा दर्जा मिळाला नव्हता. भविष्यातील गरजा आणि विकास लक्षात घेऊन आपण नगर परिषद स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यश येऊन घुग्घूस नगर परिषदेची स्थापना झाली, असे त्यांनी सांगितले. यामुळे शहरातील नागरी सुविधा आणि विकासकामांना अधिक चालना मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगर परिषदेच्या स्थापनेनंतर शहरातील विकासकामांना अधिक व्यापक स्वरूप मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
घुग्घूसमधील उड्डाणपूल आणि आता हे ग्रामीण रुग्णालय ही शहराच्या विकासातील महत्त्वाची पावले असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. नगर परिषदेची स्थापना, उड्डाणपूल आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालय अशा टप्प्याटप्प्याने घुग्घूसच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि आवश्यक नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. विकासाची ही गती कायम राखत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही आमदार जोरगेवार यावेळी म्हणाले.