चंद्रपूर जिल्हा बँकेत सहकार सप्ताह २०२६ चा प्रारंभ, वैशालीताई वासाडे यांचा सत्कार
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील मा.सा. कन्नमवार सभागृहात १९ ते २५ सप्टेंबर या काळात साजऱ्या होणाऱ्या 'सहकार सप्ताह २०२६' चा उत्साहात व दिमाखात शुभारंभ झाला. सहकार महर्षी कै. अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती वैशालीताई वासाडे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. तसेच कै. बाबासाहेब वासाडे यांच्यासोबत काम केलेल्या सहकारनिष्ठ सहकाऱ्यांचाही कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा बँकेच्या संचालिका प्रतिभाताई धानोरकर होत्या, तर उद्घाटन चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार सुधाकर अडबाले, बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, संजय वासाडे, बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे आणि मानद सचिव अवेश खान पठाण उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी स्व. बाबासाहेब वासाडे यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली. स्व. वासाडे यांच्यामुळेच सहकाराची खरी ताकद, बारकावे आणि मूल्ये शिकता आली असून त्यांच्यामुळेच आजही सहकार क्षेत्रात सक्षमपणे उभे राहून जनतेची सेवा करता येत असल्याचे शिंदे म्हणाले. भावी पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी बँकेच्या आवारात बाबासाहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरवर्षी १९ सप्टेंबर या पुण्यतिथीनिमित्त 'सहकार सप्ताह' साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय बँकेने घेतल्याची घोषणाही शिंदे यांनी केली, ज्याला उपस्थितांनी सहमती दर्शवली.
आमदार सुधाकर अडबाले यांनी बाबासाहेब हे केवळ सहकार क्षेत्रातील नेते नव्हते, तर सहकारासोबतच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. बँकेचा सहकार सप्ताह कार्यक्रम कौतुकास्पद असून भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार बंटीभाऊ उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांनी बाबासाहेबांनी घडवलेल्या एका कार्यकर्त्याच्या भेटीचा प्रसंग सांगत, बाबासाहेबांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता विचाराशी तडजोड न करता एकनिष्ठतेने वावरणारा असतो असे मत मांडले. बाबासाहेब वासाडे यांनी बचतगट चळवळ उभारून चंद्रपूर जिल्हा बँकेचे नाव राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर नेले, असे ते म्हणाले. आजच्या घडीला ६,००० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करणारी ही जिल्हा बँक विदर्भात प्रथम स्थानी आहे, ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असून यात बाबासाहेब आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. बाबासाहेब वासाडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम बँकेने त्वरित हाती घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
हंसराज अहिर यांनी बाबासाहेबांचे जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी, विशेषतः राज्यातील ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासह सहकार चळवळीतील इतर नेत्यांशी संबंध होते, आणि याच संबंधांचा वापर करून बाबासाहेबांनी आपल्या बुद्धिकौशल्याने जिल्ह्यात सहकाराचे जाळे पसरवले व जिल्ह्याचे नाव उंचावले, असे सांगितले. बाबासाहेब हे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार शहरी व ग्रामीण भागात खोलवर रुजलेले आहेत. बाबासाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित सहकार सप्ताह हा सहकारी संस्था व सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत अहिर यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, कै. बाबासाहेब वासाडे यांनी पळसगाव येनबोडी या गावापासून सुरुवात करत ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी शैक्षणिक संस्था ग्रामीण भागातच उभारल्या आणि ग्रामीण जनतेशी एकनिष्ठ राहून सहकाराचे जाळे विणले. याचाच परिणाम म्हणून त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात सलग सहा वेळा नाबार्ड पुरस्कृत बचतगट योजनेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्हा बँकेला पारितोषिक मिळाले. आजही बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, जिल्हा बँकेला दिलेले ८३५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करून ८४८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. तसेच ७,०७४ महिला बचतगटांना १८७ कोटी रुपयांचे कर्जवाटप करून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात बचतगट कर्जवाटपात उच्चांक गाठल्याचे त्या म्हणाल्या. बचतगटांना कर्जवाटपाचे हे काम कै. बाबासाहेब वासाडे यांच्या कार्यकाळात सुरू झाले आणि ते अविरत सुरू असून, बँकेने बाबासाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा बँकेच्या सर्व शाखा व सहकारी संस्थांमध्ये सहकार सप्ताह आयोजित करून सहकार चळवळ बळकट करण्याचे काम सुरू ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार देवराव भोंगळे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि बाबासाहेबांच्या विचारांवर चालत ग्रामीण भागाला समृद्ध व स्वावलंबी करण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला. बँकेतर्फे सर्व शेतकरी, महिला आणि सहकारप्रेमींचे आभार मानण्यात आले.
यावेळी बँकेचे संचालक सुदर्शन निमकर, गणेश तर्वेकर, रोहित बोम्मावार, गजानन पाचोडे, जयंत टेंभुर्डे, निशिकांत बोरकर, दिनेश चोखारे, उल्हास करपे, यशवंत दिघोरे, डॉ. ललित मोटघरे, दामोदर मिसार, डॉ. अनिल वाढई, सौ. नंदाताई अल्लुरवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कल्याणकर यांच्यासह बाबासाहेबांना मानणारा शेतकरी वर्ग, बचतगटातील महिला तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.