सोनोरीत रस्त्यासाठी २० लाख खर्चूनही खड्डे कायम, अभियंत्यावर कारवाईची मागणी
सासवड सोनोरी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, दर्जा न तपासता बिले काढणाऱ्या अभियंत्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
सासवडजवळच्या सोनोरी गावात राजकीय पातळीवर लाखो रुपयांची विकासकामे झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच शाळेच्या दोन वर्गखोल्या आणि दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल एक कोटी रुपये खर्च झाल्याचे उघड झाले होते. आता याच गावातील अवघ्या २०० मीटर रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये खर्च करूनही रस्त्यावर खड्डे तसेच असल्याचे पुढे आले असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
सासवड ते सोनोरी या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या रस्त्यावरील ३ मीटर रुंदी आणि २०० मीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट कामासाठी २० लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अभियंत्याशी संगनमत करून प्रत्यक्षात काम पूर्ण न करताच पैसे उचलल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. कामाचा दर्जा न तपासताच बिले काढून देणाऱ्या संबंधित अभियंत्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शाळेच्या दुरुस्तीचे काम मूळ ठेकेदार सुधीर कातोरे यांनी घेतले होते, पण प्रत्यक्ष बांधकाम गावातीलच पोट ठेकेदार नितीन काळे यांच्याकडून करून घेण्यात आले. रस्त्याच्या कामाबाबतही असाच प्रकार घडला. शिवरी येथील ठेकेदार किरण कामथे यांनी हे काम घेतले, पण स्वतः काम न करता तेही पुन्हा नितीन काळे यांनाच देण्यात आले. ३ मीटर रुंदी आणि २०० मीटर लांबीच्या या कामासाठी २० लाख रुपये मिळाल्याची माहिती पंचायत समितीचे बांधकाम उपअभियंता संतोष नलावडे यांनी दिली.
विशेष म्हणजे, कामाचा दर्जा न तपासता बिले वर्ग करून टक्केवारीतून मलिदा खाणारे अभियंता नलावडे हेच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे त्यांचीच खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी आरपीआय (आठवले) पक्षाचे तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केली आहे.
जिल्हा नियोजन समितीमधून पंचायत समितीच्या माध्यमातून या २०० मीटर रस्त्यासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या भरणे तसेच काही काम अद्याप बाकी असल्याचे पंचायत समितीचे बांधकाम उपअभियंता संतोष नलावडे यांनी सांगितले. मात्र अधिकारी खोटे बोलत असून प्रत्यक्षात पूर्ण बिले काढून घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावरून संतोष नलावडे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बळीराम सोनवणे यांनी पुन्हा एकदा केली आहे.