राज्यात उद्या-परवा जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान खात्याने 20 आणि 21 सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा दिला असून अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून थोडा उघडीप घेतलेला पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 20 आणि 21 सप्टेंबर या दोन दिवसांत राज्यातील वेगवेगळ्या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त राहणार असून यासाठी अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
20 सप्टेंबरला उत्तर कोकणातील जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसासोबत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. या दिवशी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहण्याची शक्यता असल्याने वादळी वाऱ्याचाही धोका आहे. दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
20 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट परिसर, कोल्हापूर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांसह विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट लागू असेल.
सोमवार, 21 सप्टेंबरला पावसाचा भर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे सरकणार आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसासोबत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहील. मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. कोकण-गोव्यात मात्र वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहून हलका ते मध्यम पाऊस पडेल.
21 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक व नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे व घाट परिसर, कोल्हापूर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा लक्षात घेता शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. विजा चमकत असताना झाडाखाली थांबणे टाळावे आणि सुरक्षित जागी आसरा घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.