गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:30 IST

छत्रपती कारखाना बंद पडू देणार नाही, गरज पडली तर स्वतःला विकेन - अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा निर्धार

भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यात अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.

छत्रपती कारखाना बंद पडू देणार नाही, गरज पडली तर स्वतःला विकेन - अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा निर्धार
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पुणे जिल्ह्यात यंदाचा पहिला बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा घेण्याचा मान छत्रपती कारखान्याला मिळाला आहे. युनिट नंबर १ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक निलेश टिळेकर आणि त्यांच्या पत्नी रश्मी टिळेकर यांच्या हस्ते झाला, तर युनिट नंबर २ चा समारंभ संचालक संतोष मासाळ आणि त्यांच्या पत्नी वैशाली मासाळ यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, छत्रपतीचा मागील गळीत हंगाम दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांसह कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्यामुळे पार पडू शकला. सध्या कारखाना अडचणीत असला तरी सर्वांच्या सहकार्याने तो अडचणीतून बाहेर काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पैशाअभावी छत्रपती कारखाना बंद पडू दिला जाणार नाही, आणि वेळप्रसंगी मी स्वतःला विकेन मात्र छत्रपती बंद पडू देणार नाही, असा निर्धार जाचक यांनी बोलून दाखवला. ऊस दराच्या बाबतीत अन्य कारखान्यांच्या तुलनेत छत्रपती मागे राहणार नाही, यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पुणे जिल्ह्यात पहिला बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ छत्रपती कारखान्याचा होत असल्याचा आनंद असल्याचे जाचक यांनी सांगितले. ऊस तोडणीसाठी ऍडव्हान्स देणारा छत्रपती हा जिल्ह्यातील पहिला कारखाना आहे. या हंगामात साडेबारा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सलग आठ वर्ष बारा लाखहून अधिक टन गाळप झाल्यानंतर कारखाना पूर्णपणे अडचणीतून बाहेर येईल, असे त्यांनी नमूद केले. यावर्षीच्या ऊस गळीत हंगामासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांनीही सहकार्य केले आहे.

छत्रपतीचा हंगाम १ ऑक्टोबरला सुरू होणार असला तरी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे जाचक यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात प्रति टन ५०० रुपयाप्रमाणे दर कमी बसल्याचे गणित ग्राह्य धरले, तर तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. अडचणीतील छत्रपती कारखाना बाहेर काढण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे ते म्हणाले. आपण गेल्या अनेक वर्षांपासून सहवीज निर्मिती प्रकल्पाला विरोध करत असल्याचेही जाचक यांनी सांगितले, कारण हा प्रकल्प साखर कारखान्यासाठी फायद्याचा नसल्याचे त्यांचे मत आहे. ज्या कारखान्यांनी हा प्रकल्प राबवला ते कारखाने तोट्यातच गेले आहेत, आणि गुजरातमध्ये एकही कारखाना सहवीज निर्मिती प्रकल्प उभारत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या साखरेचे दर वाढत असून, या हंगामातही साखरेचा दर प्रति किलो ५० रुपयांच्या आत येणार नाही, असे जाचक यांनी सांगितले. छत्रपतीला निधी उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मुंबई-दिल्ली वाऱ्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या अडचणी असल्या तरी पैशाअभावी छत्रपती बंद राहणार नाही, वेळप्रसंगी पृथ्वीराज जाचक स्वतःला विकेल, पण छत्रपती बंद पडू देणार नाही, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. ऊस दराच्या बाबतीतही छत्रपती मागे राहणार नाही, मात्र सभासदांनी आपला ऊस छत्रपतीलाच गाळपासाठी द्यावा, असे आवाहन जाचक यांनी केले.

यावेळी कारखान्याचे संचालक रामचंद्र निंबाळकर यांच्यासह जयराम रायते, ॲड. संभाजीराव काटे, बाळासाहेब शिंदे, शंकरराव रुपनवर आदींनी आपल्या भाषणात विविध सूचना मांडल्या. प्रास्ताविकात या ऊस गळीत हंगामाचा आढावा कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी घेतला. सूत्रसंचालन कामगार नेते युवराज रणवरे यांनी केले, तर आभार संचालक तानाजी शिंदे यांनी मानले. या समारंभास उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांच्यासह संचालक अशोक पाटील, कैलास गावडे, सतीश देवकाते, ॲड. शरद जामदार, पृथ्वीराज घोलप, जनरल मॅनेजर हनुमंत करवर आणि इतर आजी-माजी संचालक, पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ