चंद्रपुरात निवृत्त कर्मचाऱ्याला डिजिटल अरेस्टच्या धमकीने ६३ लाखांचा गंडा
बनावट पोलीस अधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खोट्या नोटिशीच्या धाकाने WCL मधील निवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक, चंद्रपूर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
चंद्रपुरात एका निवृत्त कर्मचाऱ्याला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ६३ लाख ७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमधून (WCL) वरिष्ठ मेकॅनिक पदावरून निवृत्त झालेले ६७ वर्षीय दिनकर गोविंदराव खोब्रागडे हे या फसवणुकीचे बळी ठरले. बनावट पोलीस अधिकारी, सर्वोच्च न्यायालयाची खोटी नोटीस आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईची भीती दाखवून सायबर भामट्यांनी त्यांना गंडवले. या प्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
दुर्गापूर भागातील ऊर्जानगर परिसरात मेजर गेटजवळ पत्नीसोबत राहणारे खोब्रागडे यांच्या मोबाईलवर २६ नोव्हेंबर २०२५ रोजी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलीस दलातील अधिकारी असल्याचे भासवत खोब्रागडे यांच्या नावावर नवीन सिमकार्ड काढल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या गणवेशातील एका व्यक्तीने त्यांना व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ कॉल केला. खोब्रागडे यांच्या ओळखपत्राचा गैरवापर करून मुंबईतील कॅनरा बँकेत एक खाते उघडण्यात आले असून त्यावर परदेशातून पैसे आल्याचे भामट्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर देशविरोधी कारवायांना पाठिंबा देणारा मोहम्मद सलीम नावाचा संशयित पकडला गेला असून त्याने खोब्रागडे यांच्या खात्यात आलेल्या रकमेपैकी १० टक्के वाटा त्यांना दिल्याची बनावट कहाणीही रचण्यात आली.
खोब्रागडे यांना लगेच अटक होणार असल्याचे सांगून कोणाशीही याबाबत न बोलण्याची तंबी देण्यात आली. याबाबत कुणाला सांगितल्यास मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही अटक करू, अशी थेट धमकी दिली गेली. विश्वास बसावा म्हणून भामट्यांनी मुंबई क्राईम ब्रँचची बनावट तक्रार प्रत, कॅनरा बँकेचे खोटे स्टेटमेंट आणि सर्वोच्च न्यायालयाची बनावट नोटीस व्हॉट्सॲपवरून पाठवली. दुसऱ्या दिवशी ईडीच्या बनावट नोटिशीची प्रत पाठवून कारवाई टाळण्यासाठी मोठी रक्कम मागितली. या दहशतीखाली आलेल्या खोब्रागडे यांनी स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी आयुष्यभराची जमापुंजी आणि निवृत्तीनंतर बँक ऑफ इंडियाच्या पद्मापूर शाखेत ठेवलेल्या मुदत ठेवी मोडल्या. १ ते ३ डिसेंबर २०२५ या काळात आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांत आरटीजीएसद्वारे एकूण ६३ लाख ७ हजार रुपये वर्ग केले. पैसे उकळल्यानंतर भामट्यांनी ईडीचे समन्स रद्द झाल्याचे बनावट पत्र पाठवून त्यांची दिशाभूल केली.
या धक्क्यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या या वृद्ध दाम्पत्याने बराच काळ ही बाब कोणालाही सांगितली नाही. सप्टेंबर २०२६ मध्ये हे दाम्पत्य पुण्यातील पाषाण भागात मुलाकडे राहायला गेले असता ७ सप्टेंबर रोजी भामट्यांनी जम्मूतील बँकेत खाते उघडून पैसे घेतल्याचा नवा दावा करत पुन्हा धमकावणे सुरू केले. मात्र यावेळी सुनेला आणि मुलाला या कॉल्सबाबत संशय आल्याने त्यांनी वडिलांचा मोबाईल तातडीने बंद केला आणि संपूर्ण प्रकार जाणून घेतला, तेव्हा ६३ लाखांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. मुलाने लगेच नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवली आणि नंतर चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून तक्रार दिली.
या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३०८, ३३६, २०५, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक सुनील विठ्ठलराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर सायबर पोलीस या आंतरराज्यीय टोळीचा तपास करत आहेत.