होर्मुझ पेचानंतरही भारतात एलपीजी सिलेंडर टंचाईची शक्यता कमी, तज्ज्ञांचा दिलासा
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे सिलेंडरच्या रांगा पुन्हा लागतील अशी भीती व्यक्त होत होती, पण देशांतर्गत उत्पादन वाढ आणि मागणीतील घट यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आकडेवारीतून दिसते.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
होर्मुझच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावाचा फटका जगभरातील तेल आणि वायू पुरवठ्याला बसण्याची भीती व्यक्त होत होती. युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातही एलपीजी सिलेंडर तुटवडा निर्माण होईल की काय, अशी चिंता वाढली होती. याचाच परिणाम म्हणून अनेक शहरे आणि गावांमध्ये गॅस एजन्सी तसेच गोदामांबाहेर सिलेंडरसाठी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसले होते. मात्र आत्ताची परिस्थिती पाहता भारताने पर्यायी आयात मार्ग आणि देशांतर्गत उत्पादनावर भर देत परिस्थिती हाताळल्याचे समोर येत आहे.
युद्धापूर्वी भारताच्या जवळपास 90 टक्के एलपीजी आयातीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी हाच प्रमुख मार्ग होता. पण आता चित्र बदलले आहे. अमेरिकेसह इतर अनेक देशांकडून भारताला एलपीजीचा पुरवठा सुरू झाल्याने होर्मुझवरील अवलंबित्व पूर्वीसारखे राहिलेले नाही. या मार्गातून काही प्रमाणात पुरवठा सुरू असला, तरी तो पूर्णपणे भरवशाचा मानला जात नाही. हा जलमार्ग सलग आठवडाभर बंद राहिला तरच पुरवठ्यावर दबाव येऊ शकतो, त्यामुळे भारताने पर्यायी स्रोत आणि देशांतर्गत उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे.
सध्या भारतात दररोज सुमारे 37,000 ते 38,000 मेट्रिक टन एलपीजीचे उत्पादन होते. देशातील रिफायनरींमधील उत्पादन आणखी सुमारे 4,000 मेट्रिक टनांनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे, म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादनात 10 टक्केपेक्षा जास्त वाढ होऊ शकते. देशातील एलपीजी साठाही सध्या समाधानकारक असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे लगेच मोठा तुटवडा येण्याची शक्यता कमी आहे. तरीही युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक पुरवठ्यातील अनिश्चितता लक्षात घेता यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
आयातीवरील दबाव कमी होण्यामागे फक्त उत्पादनवाढ हे एकच कारण नाही, तर मागणीतही मोठी घट झाली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात देशातील एलपीजी वापर मागील वर्षाच्या तुलनेत 17 टक्क्यांनी घटला. घरगुती ग्राहक, व्यावसायिक ग्राहक आणि उद्योगांमधील वापरही कमी झाला असून औद्योगिक घाऊक एलपीजी वापरात जुलैमध्ये तर जवळपास 80 टक्के घट नोंदवली गेली. काही ग्राहक पाइप्ड नॅचरल गॅस, डिझेल किंवा लाकूड यांसारख्या पर्यायांकडे वळल्याचेही सांगितले जाते.
इराण-संबंधित युद्ध सुरू झाल्यापासून भारताची एलपीजी आयातही घटली आहे. ऑगस्टमध्ये आयात सुमारे 25 टक्क्यांनी घटून 14.5 लाख टनांवर आली, तरी हा आकडा त्या कालावधीतील सर्वाधिक मासिक आयात ठरला. जागतिक पातळीवरही पुरवठा घटला असून ऑगस्टमधील जागतिक सागरी एलपीजी निर्यात फेब्रुवारी 2026 च्या तुलनेत सुमारे 6 लाख मेट्रिक टनांनी आणि मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 12.5 लाख मेट्रिक टनांनी कमी होती.
होर्मुझमधील तणावामुळे अनिश्चितता कायम असली, तरी पर्यायी देशांकडून आयात, देशांतर्गत उत्पादनवाढ आणि मागणीतील घट यामुळे भारताने परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात ठेवली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांनी घाबरून सिलेंडरचा जास्तीचा साठा करण्याची सध्या तरी गरज नाही असे चित्र आहे. तरीही होर्मुझमधील घडामोडी आणि जागतिक एलपीजी पुरवठ्यावर पुढील काळात लक्ष ठेवणे गरजेचे राहणार आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.