नागपूर डीजे बंदी : नांगरे-पाटलांच्या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करा, हायकोर्टाचा आदेश; एकट्या नागपुरात नव्हे
दहीहंडी आणि मारबत उत्सवात नागपुरात डीजेचा दणदणाट झाल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने कडक भूमिका घेतली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दहीहंडी आणि मारबत या उत्सवांच्या काळात नागपूर शहरात डीजेचा प्रचंड दणदणाट झाल्याची अतिशय गंभीर दखल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने घेतली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजेवरील निर्बंधाबाबत आधीच एक अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश खंडपीठाने आता दिले आहेत.
वास्तविक ही अधिसूचना काढलेली असतानाही दहीहंडी आणि मारबत यांच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर डीजे वाजवण्यात आला, असे व्हिडिओ पुरावे याचिकाकर्त्यांनी थेट कोर्टासमोर सादर केले होते. या ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून त्रिमूर्तीनगर मंडळाच्या वतीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती आणि याच याचिकेवर आता खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
कोर्टासमोर सादर झालेल्या बातम्या आणि व्हिडिओंच्या आधारावर संबंधित आयोजकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. याशिवाय हे निर्बंध केवळ नागपूर शहरापुरतेच मर्यादित न ठेवता, विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही डीजेवरील निर्बंधांचे आदेश लागू करावेत, अशी महत्त्वाची सूचना कोर्टाने दिली आहे. म्हणजेच हा आदेश आता एकट्या नागपूरपुरता न राहता संपूर्ण विदर्भासाठी लागू होणार आहे.
डीजे बंदी किंवा ध्वनी प्रदूषणाबाबतचे नियम केवळ अधिसूचना काढून थांबत नाहीत, तर त्या नियमांचे प्रत्यक्षात काटेकोर पालन होते की नाही, हे तपासून पाहणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे मत न्यायालयाने या वेळी नोंदवले. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना 22 सप्टेंबरपर्यंत कोर्टात शपथपत्र दाखल करून, आतापर्यंत कोणती कारवाई झाली याची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.
दुसरीकडे याच नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेतही ध्वनिप्रदूषण झाल्याचे समोर आले असून, त्याबाबत सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय इतर दोन वेगळ्या कारवायांमध्येही गुन्हे नोंदवण्यात आले, असे मिळून एकूण तीन गुन्हे नोंदवले गेले आहेत. नागपूर शहरात डीजे आणि विविध साऊंड सिस्टिमवर बंदी असतानाही विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत ध्वनिप्रदूषण झाल्याचे उघडकीस आले. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त रविवारी शहरात ही शोभायात्रा काढण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीत या मिरवणुकीत ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डॉल्बी वाजवण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.