नियम धाब्यावर बसवून वाजवलेल्या डीजेवर रामनगर पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह १२.५० लाखांचे साहित्य जप्त
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कर्णकर्कश आवाजात सुरू असलेला डीजे आणि उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. शासकीय नियमांचे थेट उल्लंघन केल्याप्रकरणी संशयितांवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनगर पोलिसांना गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली होती की, काही इसम कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय अतिउच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स लावून आणि नियम मोडून कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डीजे वाजवत आहेत. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण होऊन सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचत होती. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने विनाविलंब घटनास्थळी धाव घेतली. छापा टाकल्यावर एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा साहित्य बसवून शासकीय नियमांची उघड पायमल्ली करत मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळी हजर असलेल्या ऑपरेटर आणि वाहनचालकाकडे डीजे साऊंड सिस्टीम व प्लाझ्मा वाजवण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची अधिकृत परवानगी आहे का, अशी विचारणा केली. मात्र त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि शासनाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांचे थेट उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित इसमांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ७ लाख रुपये किमतीची ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच ५ लाख ५० हजार रुपये किमतीची डीजे साऊंड सिस्टीम व उच्च क्षमतेचे प्लाझ्मा साहित्य असे मिळून एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकूरके यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे नियमबाह्य पद्धतीने डीजे वाजवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या, ध्वनीची विहित मर्यादा ओलांडून कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम किंवा प्लाझ्मा वाजवणाऱ्या तसेच विनापरवाना डीजे चालवणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा कडक इशारा चंद्रपूर पोलीस दलाकडून देण्यात आला आहे. अशा प्रकारे शासकीय नियम मोडून सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्या प्रकरणांत यापुढेही तितकीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.