गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:22 IST

राजुऱ्यात विनापरवाना डीजे जप्त, साडेबारा लाखांचा ऐवज ताब्यात; दोघांवर गुन्हा

राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने नवीन बस स्टॉपसमोर विनापरवाना डीजे वाजवणाऱ्या वाहनावर कारवाई करत बोलेरो पिकअपसह साऊंड सिस्टीम जप्त केली.

राजुऱ्यात विनापरवाना डीजे जप्त, साडेबारा लाखांचा ऐवज ताब्यात; दोघांवर गुन्हा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राजुरा पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय डीजे लावणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. नवीन बस स्टॉपसमोरून तब्बल १२ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून बल्लारशा येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजुरा येथील नवीन बस स्टॉपसमोर एका वाहनावर बेकायदेशीरपणे डीजे सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH-34-BZ-5017 या वाहनावर डीजे वाजवण्याची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी वाहनचालक आणि मालकाकडे डीजे किंवा वाद्य वाजवण्यासंबंधीच्या अधिकृत परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी आणि शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ डीजे साहित्य आणि वाहन जप्त केले.

या प्रकरणी डीजे मालक व ऑपरेटर रवी सतीश एकनकर (वय २८, रा. फुलसिंग नाईक वार्ड, बल्लारशा) आणि वाहनचालक सचिन इन्चुलाल सरोज (वय २२, रा. पंडित दीनदयाल वार्ड, बल्लारशा) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध पोलीस स्टेशन राजुरा येथे अप. क्र. ७३०/२०२६ अन्वये कलम २२३ भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ आणि कलम ३८, १३६ महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत एकूण १२ लाख ६० हजार रुपये आहे. यात ८ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी (क्र. MH-34-BZ-5017), १ लाख रुपये किमतीचे डायनॉटीक कंपनीचे २ साऊंड टॉप, २ लाख रुपयांचे क्रीश कंपनीचे ४ साऊंड बेस, ४० हजार रुपयांची क्राउन कंपनीची १ मशीन, २० हजार रुपयांचा कॉईनर कंपनीचा १ मिक्सर आणि १ लाख रुपये किमतीचा किर्लोस्कर कंपनीचा १ जनरेटर यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. गुन्हे शोध पथकातील सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, अनुप डांगे, तसेच पोलीस अंमलदार शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या आणि विनापरवाना डीजे वाजवून ध्वनीप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू ठेवली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ