नागपुरात सीपी नांगरे पाटील यांचा वॉर, मंगळवारी बाजारातील हिचकी लाउंजवर मध्यरात्री पोलिसांची धाड
नागपूर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवारी बाजार परिसरात असलेल्या बहुमजली इमारतीत हिचकी लाउंज नावाचे ठिकाण आहे. या लाउंजवर रविवारी रात्री पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशावरून कारवाई करण्यात आली. उशिरापर्यंत या लाउंजमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात असून तेथील ग्राहक डान्स करत असल्याची माहिती सीपींना मिळाली होती.
यामुळे या इमारतीच्या आसपास राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याचंही समोर आलं. ही बाब लक्षात घेऊन सीपींच्या एस्कॉर्ट पथकानं आणि सदर पोलिसांनी रात्री एक वाजता या हिचकी लाउंजवर धाड टाकली. तपासणी केली असता, नियमानुसार परवानगी असलेल्या आवाजाच्या मर्यादेच्या जवळपास दुप्पट आवाजात येथे डीजे सुरू असल्याचं आढळून आलं. यानंतर पोलिसांनी डीजे चालवणारी व्यक्ती आणि लाउंजच्या मॅनेजरविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील आरोपींमध्ये श्रीकृष्णनगर, दिघोरी येथील रहिवासी दीप शंकरराव मोरे (22) आणि कोलते ले-आउट, गोधनी रोड येथील रहिवासी अभय केशव विरखेडे (44) यांचा समावेश आहे.
नागपूर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी बाजारात असलेल्या पार्क अॅव्हेन्यू या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर हे हिचकी लाउंज आहे. येथे दररोज नियम धाब्यावर बसवून मोठ्या आवाजात डीजे सुरू असतो, अशी माहिती सीपींना मिळाली होती, आणि याच माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
रात्री एक वाजता सदर पोलिसांनी या इमारतीत धाड टाकली. इमारतीत प्रवेश करताच पोलिसांच्या कानी डीजेचा आवाज पडला. त्यामुळे पोलिसांनी बाराव्या मजल्यावरच नॉइज लेव्हल मीटरने आवाजाची पातळी तपासली, तेव्हा हा आवाज 100.6 डेसिबल इतका नोंदवला गेला.
त्यानंतर पोलीस लाउंजमध्ये आत गेले असता, तेथील ग्राहक डीजेच्या तालावर नाचताना दिसले. हे पाहताच पोलिसांनी तात्काळ डीजे बंद करायला लावला. डीजे दीप आणि मॅनेजर अभय यांच्याविरोधात सदर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी लाउंजमधील संपूर्ण डीजे यंत्रणा जप्त केली. यामध्ये मिक्सर, बेस, टॉप स्पीकरसह इतर साहित्याचा समावेश आहे. एपीआय भगवान कोळी, पीएसआय प्रवीणकुमार डहाळे, हेड कॉन्स्टेबल अनूप लोळुसरे, अरशद शेख, सोमेश्वर निखारे, राजेश घोंगडे, साहिल भोयर, नितीन नारे आणि विष्णू खाटके यांनी ही कारवाई केली.