नागपुरात डीजे आवाजावरून वाद, हायकोर्टाच्या आदेशानंतर संदीप जोशींचा मूक मोर्चा
गणेशोत्सवाच्या तोंडावर डीजेच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा चर्चेत, कोर्टाच्या आदेशानंतर भाजपचे माजी आमदार रस्त्यावर उतरले
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यासह देशभरात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू असतानाच सण-उत्सवांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या मोठ्या आवाजाच्या डीजे आणि साऊंड सिस्टीमचा मुद्दा नागपुरात पुन्हा एकदा तापला आहे. डीजेमुळे होणारा त्रास आणि ध्वनी प्रदूषण याविरोधात याआधीच आवाज उठवणारे भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी नागपुरात डीजे बंदीची मागणी सर्वात आधी केली होती. आता त्याच मुद्दयावरून त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.
नागपूरकर मोठ्या संख्येने डीजेविरोधात रस्त्यावर उतरले असून संदीप जोशी यांच्या नेतृत्वात लक्ष्मी भुवन चौकातून हा मोर्चा सुरू झाला. मोर्चेकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे, त्यांचा डीजेला विरोध नाही, पण उत्सव साजरा करताना आवाजाची मर्यादा पाळली गेली पाहिजे आणि त्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये. कुठल्याही सण-उत्सवाला त्यांचा विरोध नसून केवळ डीजे आणि साऊंड सिस्टीममुळे होणारा त्रास आणि ध्वनी प्रदूषण यावर निर्बंध असावेत, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी आहे.
संदीप जोशी यांनी सांगितले की, पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने योग्य ती कारवाई करत आहे. मात्र कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला हवी, त्या पद्धतीने होत नाही. त्यांच्या मते, आदल्या दिवशीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयात पोलीस प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले असून जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. जोशी यांनी स्पष्ट केले की, आपला कुठल्याही उत्सवाला विरोध नाही, कुठल्याही मिरवणुकीला विरोध नाही आणि कुठल्याही धर्माला किंवा राजकीय पक्षाला विरोध नाही. त्यांचा एकमेव आणि स्पष्ट मुद्दा फक्त आवाजाच्या निर्बंधांबाबत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागपुरातील दहीहंडी आणि मारबत उत्सवात वाजवल्या गेलेल्या डीजेच्या दणदणाटाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजे निर्बंधावर काढलेल्या अधिसूचनेची पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. अधिसूचना जारी करूनही दहीहंडी आणि मारबत मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजे वाजवण्यात आल्याचे व्हिडीओ पुरावे याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर सादर केले होते. ध्वनी प्रदूषणाच्या या प्रकरणात त्रिमूर्तीनगर मंडळाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
कोर्टाने नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही डीजेवरील निर्बंधांचे आदेश लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागपुरातील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि माजी महापौर संदीप जोशी डीजे बंदीच्या मुद्दयावरून रस्त्यावर उतरले असून त्यांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ नागपूरकरही मोठ्या संख्येने लक्ष्मी भुवन चौकात जमले होते.