वर्धा पोलीस दामिनी पथकाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 25 दुचाकी सुपुर्द
महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या दामिनी पथकाला जिल्हा नियोजन समितीच्या सहकार्याने 25 TVS Jupiter दुचाकी वाहने देण्यात आली.
वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या दामिनी पथकाला बळकटी देण्यासाठी 25 नव्या दुचाकी वाहनांचा हस्तांतरण सोहळा दिनांक 10/09/2026 रोजी पोलीस मुख्यालय वर्धा येथील कवायत मैदानावर पार पडला. महिला व मुलींच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यासाठी तसेच महिलांकडून येणाऱ्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देऊन आवश्यक ती पोलीस मदत उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समिती वर्धा यांच्या सहकार्यातून पुरवण्यात आलेली ही TVS Jupiter दुचाकी वाहने जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते दामिनी पथकाला सुपुर्द करण्यात आली.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवणे, शाळा-कॉलेज, बाजारपेठा, बस स्टँड तसेच महिलांची वर्दळ असलेल्या भागात नियमित भेटी देणे आणि तक्रारींची तात्काळ दखल घेणे हा या वाहन वाटपामागचा उद्देश आहे. 25 दुचाकींपैकी पोलीस स्टेशन वर्धा शहर, हिंगणघाट, आर्वी आणि पुलगाव या स्टेशनना प्रत्येकी 2 दुचाकी देण्यात आल्या आहेत, तर उर्वरित पोलीस स्टेशनना प्रत्येकी 1 दुचाकी मिळाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील दामिनी पथकाला 2 दुचाकी वाहने देण्यात आली आहेत. या वाहनांमुळे दामिनी पथकाला गरजेच्या ठिकाणी जलद पोहोचणे, महिला व मुलींशी संवाद साधणे, तक्रारींची तात्काळ दखल घेणे आणि छेडछाड किंवा महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटनांवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होणार आहे.
दामिनी पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षेबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक गस्त आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद यावर विशेष भर दिला जाणार असून, महिला व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी वर्धा पोलीस दल सातत्याने कार्यरत आहे. याच कार्यक्रमात जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी उपस्थितांना महिला व मुलींचे कायदेशीर हक्क, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
पोलीस अधीक्षक वर्धा सौरभकुमार अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांची सुरक्षा ही केवळ पोलीस दलाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. महिलांनी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला घाबरून न जाता तात्काळ दामिनी पथकाच्या हेल्पलाईन क्रमांक 7620520025 वर किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे महिला सुरक्षेच्या उपाययोजनांना अधिक गती मिळणार असून, 'सुरक्षित महिला-सुरक्षित समाज' या उद्दिष्टाच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी शोभिका पाठक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे, महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण तसेच जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी आणि कॉलेजमधील प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव वंदना कारखेले यांनी केले, तर आभार प्रदर्शन दामिनी पथक प्रमुख माधुरी वाघाडे यांनी केले.