वर्धेत प्रभागनिहाय विकास आराखडा सादर करण्याचे पालकमंत्री भोयर यांचे निर्देश
वर्धा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषदेने प्रभागनिहाय प्रस्ताव तयार करावेत, अशी सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी बैठकीत दिली.
वर्धा शहराचा विकास सगळ्या प्रभागांमध्ये सारखा व्हावा, यासाठी नगरपरिषदेने प्रत्येक प्रभागाचा विकासकामांचा एकत्रित प्रस्ताव तयार करावा आणि त्यासाठी निधी दिला जाईल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
वर्धा शहरातील विकासाचे विषय, प्रलंबित कामे आणि पुढे काय अपेक्षित आहे, यावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर तसेच नगरपरिषदेचे सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक आणि अधिकारी हजर होते.
शहरात अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याची यंत्रणा उभारण्यात आली असून, काही ठिकाणी यात अडचणी येण्याची शक्यता असल्याचे पालकमंत्री म्हणाले. त्यामुळे कंत्राटदार, सल्लागार आणि नगरपरिषदेने प्रत्येक प्रभागात पाहणी करून त्रुटी शोधाव्यात आणि त्या दुरुस्त करण्यासाठी लागणारे सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरात जी वाचनालये सुरु करण्यात आली आहेत, ती नियमित सुरु राहावीत आणि त्यांची देखभाल व्यवस्थित व्हावी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमधून नगरपरिषदांना निधी मिळतो. यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे प्रस्ताव एकत्र करून शासनाकडे पाठवावेत आणि जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. शहरात वाहनांची व वर्दळीची संख्या वाढत असल्याने प्रमुख चौक अतिक्रमणमुक्त ठेवावेत आणि फेरीवाल्यांनी अनावश्यक ठिकाणी गाड्या लावून वाहतुकीला अडथळा करू नये, यासाठी नगरपरिषद आणि पोलिस विभागाने एकत्र येऊन व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मोकाट जनावरे आणि कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नगरपरिषदेने यावर कायमस्वरुपी उपाययोजना करावी आणि मोकाट जनावरे पकडताना अडचण आल्यास पोलिस विभागाने सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले. शहर तसेच ग्रामपंचायत हद्दीतील जनावर मालकांनी आपली जनावरे शहरात फिरू देऊ नयेत, यासाठी जनजागृती करण्याच्याही सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
वर्धा शहरात कचरा जमा करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने रोजचा कचरा उचलून इंझापूर येथे न्यावा लागतो, मात्र यासाठी पुरेशी वाहने नसल्याचे सांगत काही नगरसेवकांनी आणखी 20 वाहनांची मागणी बैठकीत केली. यावर आवश्यक वाहने उपलब्ध करून दिली जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. कचरा संकलन आणि इंझापूर येथील कचरा विल्हेवाटीच्या कामात एवोनिथची मदत मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आयुष्मान भारत कार्डधारकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. ग्रामीण भागात कार्डधारकांची संख्या जास्त असून वर्धा शहरातही ही संख्या वाढावी, यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन प्रत्येक वॉर्डात शिबिरे घ्यावीत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. यंदा वर्धा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झालेला नसल्याने संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आराखडा तयार करण्याच्याही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीमार्फत नगरपरिषद क्षेत्राच्या विकासासाठी तीन लेखाशीर्षांखाली निधी दिला जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. नगरसेवकांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांशी समन्वय साधून आपापल्या प्रभागातील प्राधान्याची कामे सुचवावीत आणि प्रभागनिहाय सर्व प्रस्ताव एकत्र करून याच आठवड्यात जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत, असे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या तरतुदीतून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
बैठकीत पालकमंत्र्यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील समस्या, अपेक्षा, प्रलंबित कामे आणि शहरासाठी नव्याने काय करता येईल, याविषयीची मते जाणून घेतली. यावेळी अनेक नगरसेवकांनी अतिक्रमण, मोकाट जनावरे, अवैध धंदे आणि शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासह विकासकामांबाबत आपली मते मांडली.