वाईत नगरपरिषदेची अतिक्रमणविरोधी मोहीम; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या, गटारांवरील बांधकामे हटवली
मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या आदेशाने वाई नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विनापरवाना फलक आणि अतिक्रमणांवर कारवाई केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वाई शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि ठिकठिकाणच्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी नगरपरिषदेने शुक्रवारी मोठी कारवाई हाती घेतली. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या आदेशानुसार नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील वेगवेगळ्या भागांत जाऊन विनापरवाना फ्लेक्स, फलक आणि होर्डिंग्ज हटवली. यासोबतच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, लोखंडी बॅरिकेड्स, गटारांवरील बेकायदेशीर बांधकामे आणि रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवरही कारवाई करण्यात आली.
शहरातील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर परवानगीविना उभारलेल्या फलकांमुळे शहराचे रूप बिघडत होते. त्याचबरोबर रस्त्याकडेला उभ्या राहिलेल्या टपऱ्या आणि दुकानांसमोरील अतिक्रमणांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. याबद्दल नागरिकांच्या सतत तक्रारी येत असल्याने प्रशासनाने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
किसनवीर चौक, गणपती आळी, भाजी मंडई परिसर तसेच महामार्गाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरून पथकाने विनापरवाना फलक हटवले. वाहतुकीच्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या काही टपऱ्या जप्त करण्यात आल्या. काही दुकानदारांनी दुकानांसमोर लोखंडी बॅरिकेड्स लावून गटारांवर अतिक्रमण केले होते आणि रस्ता अडवून वाहने पार्क करण्याची अनधिकृत व्यवस्था केली होती, अशा ठिकाणीही कारवाई झाली.
रस्ते, चौक आणि सार्वजनिक जागा या कोणाच्याही खासगी मालमत्तेच्या नसून त्या सर्वसामान्य नागरिकांसाठी असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले असून, वाहतुकीला अडथळा करणाऱ्या आणि विनापरवाना फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांनी नियम पाळावेत, असा इशारा दिला आहे. वाईचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात घेता शहराचे सौंदर्य टिकवणे, सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे गरजेचे असल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगितले. यापुढेही अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई सुरू राहणार असून, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक आणि गरज पडल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर न लावता उपलब्ध अधिकृत जागेतच पार्क करावीत, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले. या कारवाईत नारायण गोसावी, कोमल मधुकर साबळे, अनंत प्रभुणे, सर्वेश खाडे, मनोज बारटक्के, विजय मारोडा, चंद्रकांत अडसूळ, राहुल शिंदे, यश पवार, आदित्य कांबळे, प्रसाद पाटोळे, सागर लाड, कैलास लाड, रोहित गाढवे, राजेंद्र चौगुले, अमोल रोकडे, प्रमोद जाधव, रवींद्र काळोखे आणि आयुष लाड सहभागी झाले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले की, पार्किंगचा प्रश्न गंभीर असून वाहनधारकांनी वाहने योग्य जागी लावावीत, मात्र हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचाही विचार केला जाईल. रस्त्याकडेला टपरी लावून व्यवसाय करणाऱ्यांसाठी हॉकर्स झोन तयार करून त्यांच्या उपजीविकेचा मार्ग काढला जाणार असून, कोणावरही उपासमारीची वेळ येणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.