एक वर्षापूर्वी हरवलेली महिला जिवंत सापडली, समाधी बांधलेल्या कुटुंबाची सुखरूप घरवापसी
गडचिरोली जिल्ह्यातील मोहरली येथील ६० वर्षीय महिला मानसिक अस्वस्थतेमुळे वर्षभरापूर्वी घर सोडून निघून गेली होती. कुटुंबाने तिचा मृत्यू गृहीत धरून समाधी बांधली होती, पण एका आश्रमाने सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओमुळे ती जिवंत असल्याचे उघड झाले.
विदर्भातील एका घटनेने सोशल मीडियाच्या ताकदीचा प्रत्यय पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. घरातून निघून गेलेली एक महिला वर्षभर कुठेही न सापडल्याने तिच्या नातेवाइकांनी तिच्या जिवंत असण्याची आशाच सोडून दिली होती. स्थानिक रीतीरिवाजानुसार त्यांनी तिचे अंत्यसंस्कार उरकले, तेरवीचा कार्यक्रम केला आणि शेतात तिची समाधीही बांधून घेतली होती.
पण नियतीने वेगळाच खेळ मांडला. एका व्हायरल व्हिडिओमुळे ही बेपत्ता महिला जिवंत असल्याचे कुटुंबाला कळाले आणि एका सामाजिक संस्थेच्या तत्परतेमुळे ती तब्बल वर्षभरानंतर सुखरूप घरी परतली.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड परिसरातील मोहरली गावची रहिवासी असलेली ६० वर्षीय दस्सो मुक्का कांदो ही महिला मानसिक स्थिती ठीक नसल्याने वर्षभरापूर्वी अचानक घर सोडून निघून गेली होती. कुटुंबीयांनी छत्तीसगडसह विविध भागांत तिचा कसून शोध घेतला, पण तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. शोधाची आशा दिवसेंदिवस मावळत गेल्याने अखेर कुटुंबीयांनी ती मरण पावल्याचे गृहीत धरले. काही महिन्यांपूर्वी स्थानिक परंपरेनुसार तिचे कपडे खड्ड्यात ठेवून समाधी बांधण्यात आली आणि तेरवीचा कार्यक्रम करून संपूर्ण गावाला जेवणही देण्यात आले.
दरम्यान, नागभीड तालुक्यातील तळोधी-बाळापूर परिसरात रस्त्याच्या कडेला भटकत असताना मुक्का कांदो एका स्थानिक नागरिकाच्या नजरेस पडली. त्या नागरिकाने माणुसकी दाखवत तातडीने नांदेड (ता. नागभीड) येथील डोमाजी आधार फाऊंडेशनतर्फे चालवल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आश्रमाशी संपर्क साधला. माहिती मिळताच आश्रमाचे सदस्य परमेश्वर मळावी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या निराधार महिलेला आश्रमात दाखल करून घेतले.
आश्रमात नागपूर येथील मनोरुग्ण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने तिच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. योग्य देखभाल आणि औषधोपचारामुळे तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली. यानंतर आश्रमाने तिच्या रेस्क्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ दस्सोच्या भाच्यासह गावातील इतर लोकांच्याही पाहण्यात आला आणि वर्षभरापासून बेपत्ता असलेली आई जिवंत असल्याचे कुटुंबीयांना कळाले.
याची खात्री पटल्यानंतर डोमाजी आधार फाऊंडेशनचे परमेश्वर मळावी, रजनी कुंभारे, मनीष खोब्रागडे, आशिष खोब्रागडे, आदित्य उईके आणि समृद्ध खोब्रागडे या कार्यकर्त्यांनी वाहनाने तब्बल पाच तासांचा प्रवास करून मुक्का कांदो हिला तिच्या मूळ गावी मोहरली येथे सुखरूप पोहोचवले. दारात आईला जिवंत उभी असलेली पाहून तिचा पती, मुलगा आणि मुलीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. जिच्या नावाची समाधी बांधली होती, तीच आई पुन्हा समोर उभी राहिल्याने संपूर्ण गाव आश्चर्यचकित आणि भावुक झाले.