शेवगावात पावसाळ्यातही दुष्काळसदृश स्थिती, तीन महिने पाऊस नाही, पिके करपली
शेवगाव तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली असून विहिरी आणि जलसाठे आटत चालले आहेत. शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी बांधावर येऊन पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात यंदा पावसाळ्यातच दुष्काळसदृश भीषण स्थिती तयार झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. पिके करपू लागली आहेत, विहिरी आणि जलसाठे आटत चालले आहेत, तर जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालला आहे.
पावसाळ्याचे दिवस असतानाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने आता उन्हाळ्यात काय होणार, या चिंतेने शेतकऱ्यांच्या जिवाला घोर लागला आहे. अनेक भागांत खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, शेतीवर केलेला खर्च तरी वसूल होईल की नाही, याची काळजी शेतकऱ्यांना सतावते आहे.
यंदाचा पोळा सणही शेतकऱ्यांना अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. शेतकऱ्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. मात्र यंदा पाणी, चारा आणि पिकांच्या संकटामुळे अनेक ठिकाणी उत्सवाचा उत्साहच हरवलेला दिसला.
परिस्थितीशी झुंजत असलेल्या शेतकऱ्यांनी आता राजकीय नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार मोनिका राजळे, खासदार निलेश लंके, माजी खासदार सुजय विखे, माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते प्रताप ठाकणे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या भीषण स्थितीची पाहणी का केली नाही, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
निवडणुकीच्या वेळी बांधावर जाऊन मतांची मागणी करणारे हेच नेते शेतकरी संकटात असताना त्यांच्या बांधावर कधी दिसणार, हा प्रश्न आता संतापाने विचारला जातो आहे. दुष्काळाची तीव्रता केवळ कागदावर मोजण्याऐवजी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करून सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी कोण करणार, हाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाळ्यातच अशी स्थिती असेल तर पुढच्या उन्हाळ्यात संकट किती मोठे असेल, या कल्पनेनेच शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शेतकऱ्यांना आता आश्वासने नकोत, प्रत्यक्ष मदत हवी आहे. दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करून पंचनामे, पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि पिकांसाठी लागणारी मदत याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरते आहे.
शेतकऱ्यांची आता आरपारची मागणी आहे. कोणत्याही पक्षाची पोकळ आश्वासने किंवा भाषणे नकोत, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने पावले उचलावीत, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून सर्व बाधित पिकांचे सरसकट पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी आहे. जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत आणि पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करावेत, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पीक विम्याची भरपाई आणि शासकीय मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सरकारदरबारी आक्रमक भूमिका मांडावी, अशीही मागणी आहे. निसर्गाने पाठ फिरवली आहेच, पण लोकप्रतिनिधींनीही अशीच पाठ फिरवली, तर शेवगावचा शेतकरी शांत बसणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.