गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:59 IST

साताऱ्यातील शेनवडी जिल्हा परिषद शाळेला कदम दांपत्याकडून १ लाख १६ हजारांचा स्मार्ट बोर्ड भेट

माण तालुक्यातील शेनवडी जिल्हा परिषद शाळेला गावचे सरपंच दांपत्य आणि गावकऱ्यांच्या मदतीने डिजिटल साधने, क्रीडा साहित्य मिळाले.

साताऱ्यातील शेनवडी जिल्हा परिषद शाळेला कदम दांपत्याकडून १ लाख १६ हजारांचा स्मार्ट बोर्ड भेट
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

साताऱ्यातील माण तालुक्यातील म्हसवड बीटमधील वरकुटे-मलवडी केंद्राच्या हद्दीत असलेली शेनवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता डिजिटल साधनांच्या मदतीने मुलांना शिकवत आहे. गावच्या विद्यमान सरपंच जयश्री मोहन कदम आणि माजी सरपंच मोहन विठोबा कदम या दांपत्याने मुलांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, या हेतूने शाळेला १ लाख १६ हजार रुपये किमतीचा इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनेल बोर्ड भेट दिला. हा डिजिटल पॅनेल बोर्ड नवनीत या कंपनीकडून घेण्यात आला असून, हे काम पूर्ण होण्यासाठी ग्लोबल शिक्षक बालाजी जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.

याशिवाय कदम दांपत्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, कंपास, पेन, पाटी यांसारखे ५० हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्यही वाटले. जयश्री कदम आणि मोहन कदम हे दोघेही परिसरात दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात आणि शाळेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या या दातृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

गेल्या वर्षी शाळेतील मुलांनी यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धेत चांगला सहभाग नोंदवला होता. हे पाहून शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष समाधान पांडुरंग खिलारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये किमतीचे स्पोर्ट किट म्हणजे खेळाचा गणवेश दिला. शेनवडीच्या जिल्हा परिषद शाळेतील मुले सातत्याने क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले कौशल्य दाखवत असल्यामुळे गावकऱ्यांनी या कलागुणांना वाव देण्यासाठी ही मदत केली.

गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतही शेनवडी शाळेतील चार विद्यार्थी पात्र ठरले होते. शाळेतील बनसोडे सर आणि हजारे सर हे चांगले काम करत असून शाळेच्या गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावत आहे, त्याबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे. योगा, बुद्धिबळ, स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा, शिष्यवृत्तीसाठीचे नियमित जादा तास, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर आणि मुलांना दिले जाणारे संगणकाचे ज्ञान, या सगळ्यांमुळे ही शाळा नावारूपाला आली आहे.

इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनेल आणि स्पोर्ट किट दिल्याबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे आणि केंद्रप्रमुख विनायक काटकर यांनी सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी बनसोडे सर आणि हजारे सर यांच्याबद्दलही गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, माजी सरपंच संजय खिलारी, सुरेश कदम सर, सूरज कदम, ग्रामपंचायत सदस्य नंदा खिलारी, हरीश खिलारी, धनाजी कदम, लीनाताई कदम, मनीषा खिलारी, उपसरपंच यशवंत पारशी, प्रकाश खिलारी, नामदेव शिरतोडे सर आणि ग्रामसेवक विजय आटपाडकर, विकास खिलारी हे उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ