गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:00 IST

रोजगार महाकुंभातून जास्तीत जास्त युवकांना नोकरी द्या - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचे निर्देश

वर्धा जिल्ह्यात 29 सप्टेंबरला 11 ठिकाणी होणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा.

रोजगार महाकुंभातून जास्तीत जास्त युवकांना नोकरी द्या - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचे निर्देश
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

वर्धा जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 11 ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळावे होणार असून, यात जास्तीत जास्त नामांकित कंपन्यांना सहभागी करून घ्या आणि त्यांच्याकडील रिक्त पदे मेळाव्यातूनच भरण्याचे नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील युवकांसाठी हे मेळावे मोठी संधी असल्याचे सांगत, जास्तीत जास्त युवकांना यात सहभागी करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत रोजगार महाकुंभ मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी या सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सुधाकर झळके, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गाते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पदवी व पदव्युत्तर युवकांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच मेळाव्याला येणाऱ्या युवक-युवतींची गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक त्या सुविधा मेळाव्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. मेळाव्याच्या ठिकाणी कंपन्यांसाठी स्वतंत्र दालने उभारावीत आणि नामांकित कंपन्यांनी निवड केलेल्या युवकांना तिथेच नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

मेळाव्यात नामांकित कंपन्यांचा सहभाग वाढावा यासाठी कौशल्य विकास विभागाने उद्योग विभागाच्या मदतीने कंपन्यांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून त्यांच्याकडील रिक्त पदे आणि मेळाव्याच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांची माहिती जमा करावी, असे निर्देश त्यांनी दिले. जास्तीत जास्त कंपन्यांनी मेळाव्याला उपस्थित राहून रोजगार इच्छूक युवकांच्या मुलाखती घ्याव्यात आणि त्यांना रोजगार द्यावा, असेही नियोजन करण्यास सांगण्यात आले.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ अंतर्गत राज्यात एकाच दिवशी 500 पेक्षा जास्त तर वर्धा जिल्ह्यात 11 रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह होणार आहेत. राज्यातील प्रत्येक युवकाला त्याच्या क्षमतेनुसार रोजगार मिळावा ही शासनाची भूमिका असून, त्याच भूमिकेतून जिल्ह्यात हा मेळावा पार पडावा, असे पालकमंत्री म्हणाले. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभव लक्षात घेऊन त्यांना योग्य रोजगाराच्या संधी तसेच आवश्यक मार्गदर्शन मेळाव्यातून केले जाणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी https://forms.gle/vBTzRQKYBBuBTreme या गूगल लिंकवरून नोंदणी करणे आवश्यक आहे.

वर्धा जिल्ह्यात अनेकांत स्वाध्याय मंदिर रामनगर वर्धा, कला वाणिज्य महाविद्यालय आर्वी, आर.व्ही.परणकर अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान महाविद्यालय आर्वी, लोकमान्य महाविद्यालय आष्टी, मॉडेल हायस्कुल कारंजा, हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुलगांव, रामदासजी तडस अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवळी, रा.सु.बिडकर महाविद्यालय हिंगणघाट, लघु उद्योग भारती (श्याम बाबा ट्रेडर्स) हिंगणघाट, विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर आणि डॉ.आर.जी.भोयर महाविद्यालय सेलू येथे हे मेळावे होणार आहेत.

मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सिव्हिल लाईन, वर्धा येथे किंवा ०७१५२-२४२७५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ.सुधाकर झळके यांनी केले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ