गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:14 IST

बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे ही सामाजिक जबाबदारी; मंगल प्रभात लोढा यांचे प्रतिपादन

२९ सप्टेंबरच्या 'पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा'च्या पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एम्प्लॉयर राऊंड टेबल कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी उद्योगांना सहभागाचे आवाहन केले.

बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे ही सामाजिक जबाबदारी; मंगल प्रभात लोढा यांचे प्रतिपादन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे फक्त सरकारचे काम नाही, तर ती आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. देशात सध्या शांतता आणि स्थैर्याचे वातावरण असल्यामुळे उद्योगधंदे, व्यापार तसेच कुटुंबव्यवस्था सुरळीतपणे सुरू असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात बेरोजगार तरुण-तरुणींची संख्या मोठी असली, तरी त्याचवेळी रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र अनेकदा नोकरीच्या मुलाखतीला गेल्यानंतर आवश्यक कौशल्ये किंवा आत्मविश्वासाच्या अभावामुळे तरुण काही बाबतीत कमी पडतात आणि त्यांना अपेक्षित रोजगार मिळत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 'पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ' आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभाग आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या वतीने 'एम्प्लॉयर राऊंड टेबल' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री लोढा बोलत होते.

आज प्रत्येक तरुणाचे चांगल्या नोकरीचे स्वप्न असते, असे लोढा पुढे म्हणाले. त्यांनी विशेषतः कौशल्याधारित क्षेत्रातील रोजगाराच्या संधींकडे तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे सांगितले. परदेशात कौशल्याधारित क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना चांगले वेतन आणि रोजगाराच्या संधी मिळतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील तरुणांना कौशल्याधारित आणि चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामांकित ३२ उद्योग व आस्थापना विभागाच्या मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. येत्या रोजगार मेळाव्याबाबत उद्योग व आस्थापनांच्या काही सूचना, हरकती किंवा अडचणी असल्यास त्यांनी त्या लवकरात लवकर कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले. कौशल्य विकास विभागाच्या वतीने उद्योग व आस्थापनांसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला असून, संबंधित उद्योग व आस्थापनांनी हा अर्ज लवकरात लवकर भरून नोंदणी करावी, असे सांगण्यात आले. ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही कंपनीला तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी कौशल्य विकास विभाग अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योग व आस्थापनांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्याचप्रमाणे राज्याच्या विकासासाठी प्रत्येकाने आपल्या परीने हातभार लावावा, अशी मानसिकता प्रत्येक कंपनीमध्ये असायला हवी, असे लोढा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न देशासमोर ठेवले असून, हे स्वप्न आता टप्प्याटप्प्याने साकार होत आहे आणि भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या रिक्त जागांची माहिती द्यावी, त्यासाठी आवश्यक कौशल्ये असलेले योग्य तरुण-तरुणी उपलब्ध करून दिले जातील, असे लोढा म्हणाले. महाराष्ट्रातील तरुण-तरुणी आपलेच असून त्यांना प्रेम, सहकार्य आणि योग्य संधी देण्याची गरज आहे, त्यामुळे राज्यातील कंपन्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. रामराज्य निर्माण करणे आपल्या हातात नसले, तरी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे नक्कीच आपल्या हातात आहे. सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले, तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाच्या दिशेने निश्चितच एक पाऊल पुढे टाकता येईल, असे मंत्री लोढा यांनी म्हटले.

या कार्यक्रमात कौशल्य विकास विभागाचे आयुक्त अमित सैनी यांनी पीपीटी सादर करून उद्योग व आस्थापनाच्या मनुष्यबळ व्यवस्थापनांच्या प्रतिनिधींना रोजगार मेळाव्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हेदेखील उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ