बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात रत्नागिरीत गणरायाला साश्रू नयनांनी निरोप
रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायाला मंगळवारी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. चिपळूणसह जिल्ह्यातील नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जनासाठी मोठी गर्दी उसळली होती.
गणेशचतुर्थीच्या पवित्र दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण जिल्ह्यात चैतन्यमय वातावरण तयार झाले होते. प्रत्येक घरात बाप्पाच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती आणि संपूर्ण जिल्हा भक्तिमय रंगात न्हाऊन निघाला होता.
यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यात एकूण १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती आणि १२६ सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना झाली. म्हणजे एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणेशमूर्तींचे पूजन करून नागरिकांनी उत्सवाचा आनंद घेतला. प्रत्येक घरातून धूप-दिव्यांचा सुगंध आणि आरत्यांचा आवाज ऐकायला मिळत होता, आणि गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत होता. घरोघरी बाप्पाच्या पूजेसाठी कुटुंबीय एकत्र जमत होते आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित होत होता.
दीड दिवसांच्या पाहुणचारानंतर मंगळवारी भाविकांनी विहिरी आणि तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती. मांडवी, भाट्ये आणि पांढरा समुद्र या प्रमुख किनाऱ्यांवर दीड दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. या तिन्ही किनाऱ्यांवर सकाळपासूनच भाविकांची वर्दळ सुरू झाली होती आणि सायंकाळपर्यंत ही गर्दी वाढतच गेली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' आणि 'मंगळमूर्ती मोरया' या जयघोषांनी समुद्रकिनारे आणि परिसर दुमदुमून गेला होता.
ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि पारंपरिक पद्धतीने आरती करून भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी किनाऱ्यांवर सुरक्षेची आणि विनासायास विसर्जनाची योग्य काळजी घेतली होती. बाप्पाला निरोप देताना भाविकांनी पुढील वर्षीच्या आगमनाची आस धरून निरोप घेतला. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला.
चिपळूण शहरासह तालुक्यात घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या गणरायाला मंगळवारी भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या जयघोषाने शहरातील विविध भाग दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या आवाजात गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी संध्याकाळी भाविकांची लगबग सुरू झाली होती. घरगुती गणरायाच्या मूर्ती सजवलेल्या वाहनांमधून तसेच हातात घेऊन विसर्जनस्थळी नेण्यात आल्या.
विसर्जनापूर्वी कुटुंबीयांनी श्रींची पूजा, आरती आणि नैवेद्य दाखवून पुढील वर्षी सुख-समृद्धीने पुन्हा आगमन व्हावे अशी प्रार्थना केली. शहरातील बाजारपुल, खंड बावशेवाडी नदी, बहादूरशेखनाक्याजवळील वाशिष्ठी नदी आणि पाग नदीकिनारी मोठी गर्दी दिसली. या सर्व ठिकाणी सायंकाळी विसर्जनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गणेशभक्तांच्या सोयीसाठी स्थानिक प्रशासन, नगरपरिषद आणि संबंधित यंत्रणांकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाकडूनही बंदोबस्त ठेवण्यात आला होता.