गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या; पुण्यातील हिंगणे खुर्द भागातून घेतले ताब्यात
सिंहगड रोड पोलिसांनी हिंगणे खुर्द भागातून एका सराईत गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले.
पुण्यात खून, खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीसारख्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंहगड रोड पोलिसांनी एक मोठी कारवाई करत हिंगणे खुर्द भागातून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
सिद्धेश सुरेश पवार (वय ३१, राहणार विश्रांतीनगर, हिंगणे खुर्द, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रेकॉर्डवरील हा आरोपी हिंगणे खुर्द परिसरात संशयास्पदरीत्या थांबलेला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि सुमारे एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या सूचनेनुसार ही कारवाई पार पडली. उपनिरीक्षक भुपेश साळुंके यांच्यासह पोलिस अंमलदार उत्तम तारु आणि आण्णा केकाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
११ सप्टेंबर २०२६ रोजी सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. त्याचवेळी पोलिस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण आणि युवराज कांबळे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली. विश्रांतीनगरकडून जनता वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, शंकर मंदिराजवळ, हिंगणे खुर्द येथे काळा टी-शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातलेला एक व्यक्ती अग्निशस्त्र घेऊन रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे या खबऱ्याने सांगितले.
ही माहिती तपास पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक भुपेश साळुंके यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यानुसार साळुंके पोलिस पथकासह त्या ठिकाणी पोहोचले, तिथे एक तरुण उभा असल्याचे त्यांना दिसले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला हा तरुण उडवाउडवीची आणि असमाधानकारक उत्तरे देत होता, त्यामुळे त्याच्याकडे शस्त्र असल्याचा संशय पोलिसांना बळावला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले.
पवार याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भुपेश साळुंके करत आहेत. जप्त करण्यात आलेले हे शस्त्र त्याच्याकडे कुठून आले आणि त्याचा वापर कोणत्या कारणासाठी करायचा होता, याचा तपास पोलीस करत आहेत.