पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासकामांचा आढावा; सुनेत्रा पवार यांच्याकडून रिंग रोड, मेट्रो, पाणी प्रकल्पांना गती
सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांचा आढावा घेत मास्टर प्लॅन तातडीने राबवण्याचे निर्देश दिले.
पुणे जिल्ह्याच्या नियोजनबद्ध विकासाला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृहात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा उच्चस्तरीय आढावा घेतला. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात 674 गावांचा समावेश असून हे क्षेत्र सुमारे 5215 चौरस किलोमीटर एवढे पसरलेले आहे. या भागात होणारे झपाट्याने नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, येणाऱ्या अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचा मास्टर प्लॅन राबवावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
बैठकीत बोलताना सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, पुणे महानगर प्रदेशाचा वेगाने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन दीर्घकालीन दृष्टीने करावे.
वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने पुणे इनर रिंग रोड, सीएमपी कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅनअंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल आणि यवत रेल्वे ब्रिज या कामांना आवश्यक ती गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. पुणे शहर आणि पीएमआरडीए क्षेत्रातील विविध भागांना जोडणारी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मल्टिमोडल हब, औद्योगिक कनेक्टिव्हिटी, धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी, पर्यटन कनेक्टिव्हिटी आणि विमानतळाशी जोडणी या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून नियोजन करण्याचेही आदेश त्यांनी दिले.
माण-हिंजवडी परिसरात वाढत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता, माण-हिंजवडी-शिवाजीनगर या पुणे मेट्रो लाईन 3 चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. या मार्गिकेवर एकूण 23 स्थानके प्रस्तावित असून त्यापैकी 12 स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे, तर आणखी 5 स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पुणे महानगर प्रदेशातील इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. नदी प्रदूषण रोखण्यासाठी केवळ प्रकल्प उभारून भागणार नाही, तर संबंधित यंत्रणा आणि संस्था स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या शाश्वत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील देखभाल-दुरुस्ती आणि संचालनाचा खर्च सक्षमपणे भागवता येईल, अशा पद्धतीने प्रकल्पांचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पीएमआरडीए क्षेत्रातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेऊन अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे काम प्रगतीपथावर असून आणखी 12 अग्निशमन केंद्रे प्रस्तावित आहेत. या सर्व केंद्रांच्या कामांना गती देऊन पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.
वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करण्याची गरजही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यासाठी नवीन पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले. नवीन नागरी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे, पर्यटनस्थळे आणि वाढणारी लोकसंख्या यांना आवश्यक पाणीपुरवठा मिळावा यासाठी उपलब्ध जलस्रोत, वितरण व्यवस्था आणि भविष्यातील गरजा यांचा एकत्रित विचार करून नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
पुणे महानगर प्रदेशाचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न राहता, वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांचे जीवनमान या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करणारा असावा, अशा स्पष्ट सूचना सुनेत्रा अजित पवार यांनी बैठकीच्या शेवटी दिल्या.