गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:38 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका: बांधकाम परवानगी विभागातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर फडणवीसांचे चौकशीचे आदेश

भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्याला नोटीस बजावली, तर शहर अभियंता आणि मुख्य अभियंत्यांच्या कामकाजाचे फेरवाटपही करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिका: बांधकाम परवानगी विभागातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर फडणवीसांचे चौकशीचे आदेश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आयुक्तांनी संबंधित कार्यकारी अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी बांधकाम विभागाचे सहशहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या कामकाजाबाबत थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली होती. संबंधित अधिकारी अनेक वर्षांपासून बांधकाम परवानगी विभागात कार्यरत असून अधिकारांचा गैरवापर करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप हिंगे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी दाखल केल्या जाणाऱ्या नस्तींमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक अडचणी, उणिवा आणि त्रुटी काढून मंजुरी प्रक्रियेला विलंब केला जात असल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. विकास प्रकल्पांमधील जागांचा मूळ नकाशा किंवा रस्ता बदलणे, मंजूर आरक्षणाचे कारण सांगणे, कागदपत्रांमध्ये कायदेशीर अडथळे निर्माण करून नागरिकांची मानसिक व आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याला नोटीस बजावली.

याच काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता आणि मुख्य अभियंत्यांच्या कामकाजाचे फेरवाटपही करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचा आदेश जारी केला. शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, शहरी दळणवळण, जलनिस्सारण आणि झोपडपट्टी पुनर्वसन अशा पाच विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे तळवडे येथील जैवविविधता उद्यान, संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, वाकड येथील बॅडमिंटन कोर्ट, पिंपरी चौकातील माता रमाई सृष्टी आणि प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान या प्रकल्पांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. सेठिया यांची शहर अभियंता म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे.

मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे स्थापत्य, स्थापत्य प्रकल्प, उद्यान व क्रीडा आणि पर्यावरण अभियांत्रिकी विभाग तसेच भामा-आसखेड, आंद्रा पाणी योजना, पवना बंदिस्त जलवाहिनी आणि निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र या प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना निलंबित करण्यात आल्यानंतर ओंभासे यांच्याकडे पर्यावरण विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती, त्यानंतर आयुक्तांनी हे फेरवाटप केले.

सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर यांच्याकडून जलनिस्सारण विभाग काढून त्यांच्याकडे बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर सहशहर अभियंता विनय ओहोळ यांच्याकडे जलनिस्सारण विभाग कायम ठेवून पर्यावरण अभियांत्रिकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता संध्या वाघ यांना पदोन्नती देऊन सहशहर अभियंता करण्यात आले असून त्यांच्याकडे स्थापत्य प्रकल्प विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महापालिकेच्या 'ह' क्षेत्रीय अधिकारी पूजा दूधनाळे यांची भूमी आणि जिंदगी विभागाच्या प्रशासन अधिकारीपदी बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे वैद्यकीय विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे. संतोष कोराड यांच्याकडे 'ह' क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ